esakal | ख्रिस गेलची पंजाबमेल सुसाट 
sakal

बोलून बातमी शोधा

ख्रिस गेलची पंजाबमेल सुसाट 

ख्रिस गेलची पंजाबमेल सुसाट 

sakal_logo
By
वृत्तसंस्था

कोलकता - ख्रिस गेलच्या एका खेळीने आत्मविश्‍वास उंचावलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाबने फॉर्मात असलेल्या कोलकता नाइटरायडर्सलाही पराभूत केले. पावसाचा व्यत्यय आलेला हा सामना नऊ विकेटने जिंकून पंबाजने गुणतक्‍त्यात थेट आघाडीही घेतली. हा त्यांचा सलग तिसरा विजय आहे. 

ईडन गार्डनवर झालेल्या या सामन्यात पंजाबने दहा धावांच्या सरासरीने वाटचाल करणाऱ्या कोलकताला ७ बाद १९१ धावांवर रोखले. ८.२ षटकांत बिनबाद ९६ अशी सुरवात केली. पावसाच्या व्यत्ययामुळे १३ षटकांचा सामना झाला आणि डकवर्थ लुईसच्या नियमानुसार पंजाबला २८ चेंडूंत २९ धावांचे आव्हान मिळाले. ११ चेंडू शिल्लक ठेवूनच त्यांनी मोहीम पूर्ण केली.

पुन्हा एकदा अर्थात गेलची नाबाद ६२ धावांची वादळी खेळी पंजाबच्या विजयात मोलाची ठरली. पण त्याच वेळी केएल राहुलनेही २७ चेंडूंतील ६० धावांचे योगदानही तेवढेच तोलामोलाचे ठरले.

कोलकताकडे नारायण, पीयूष चावला आणि कुलदीप यादव, असे तीन तीन फिरकी गोलंदाज आहेत. पण गेल फॉर्मात असतो, तेव्हा कोणाचेच काही चालत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. त्याने राहुलच्या साथीत पहिल्या चेंडूपासून हल्ला सुरू केला. पावसाचा व्यत्यय अपेक्षित असल्यामुळे डकवर्थ लुईसच्या ‘गुणाकार-भागाकारा’चे समीकरण अगोदच सोडवले होते. 

पंजाबच्या विजयात गेल-राहुल यांचा वाटा जेवढा महत्त्वाचा आहे, तेवढेच यश गोलंदाजांचेही आहे. सुरवातीला सुनील नारायणला माघारी धाडले. पण ख्रिल लीन दुसऱ्या बाजून प्रहार करत असल्यामुळे कोलकता मोठी धावसंख्या उभारणार असे वाटत होते. पण पंजाबच्या गोलदाजांनी ठराविक अंतराने फलंदाज बाद केले. तरीही १८ व्या षटकांत ५ बाद १८० अशी मजल त्यांनी मारली होती. मात्र अखेरच्या दोन षटकांत त्यांच्या गाडीला ब्रेक लागले. 

कोलकता ः २० षटकांत ७ बाद १९१ (ख्रिल लीन ७४ -४१ चेंडू, ६ चौकार, ४ षटकार, उथप्पा ३४, दिनेश कार्तिक ४३ -२८ चेंडू, ६ चौकार, बरिंदर श्रण २-५०, अँड्रयु टेय्‌ २-३०) पराभूत वि. पंजाब ः ११.१ षटकांत १ बाद १२६ (राहुल ६० -२७ चेंडू, ९ चौकार, २ षटकार, गेल नाबाद ६२ -३८ चेंडू, ५ चौकार, ६ षटकार, सुनील नारायण १-२३)

loading image