मुंबई इंडियन्सला दिल्लीची धास्ती

वृत्तसंस्था
Sunday, 20 May 2018

नवी दिल्ली - तळ्यात मळ्यात असा प्रवास करणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी आता दिल्लीविरुद्धचा उद्याचा अखेरचा साखळी सामना उपांत्य फेरीसारखा असणार आहे. तळाच्या दिल्लीने बलाढ्य चेन्नईला कालच्या सामन्यात पराभूत केल्यामुळे मुंबईची धास्ती वाढली आहे.

नवी दिल्ली - तळ्यात मळ्यात असा प्रवास करणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी आता दिल्लीविरुद्धचा उद्याचा अखेरचा साखळी सामना उपांत्य फेरीसारखा असणार आहे. तळाच्या दिल्लीने बलाढ्य चेन्नईला कालच्या सामन्यात पराभूत केल्यामुळे मुंबईची धास्ती वाढली आहे.

हा सामना जिंकला तर मुंबईचा प्ले ऑफचा मार्ग जवळपास मोकळा होईल. स्पर्धेत असलेल्या इतर संघांएवढेच मुंबईचे गुण झाले तरी त्यांची निव्वळ सरासरी चांगली असल्यामुळे केवळ विजय त्यांना पुरेसा ठरणार आहे. गेल्या सामन्यात मुंबईने विजय मिळवला असला तरी त्यात वर्चस्व नव्हते, त्यामुळे एकत्रित कामगिरी करावी लागणार आहे. बुमराला सापडलेला सूर ही मुंबईच्या दृष्टीने जमेची बाब आहे.

रोहित शर्माला या निर्णायक सामन्यात आघाडीवर राहून लढावे लागणार आहे. अजूनपर्यंत अपयशी ठरणाऱ्या पोलार्डने पंजाबविरुद्ध अर्धशतकी खेळी केली होती. आता त्यात सातत्य राखण्याची जबाबदारी त्याच्यावर असेल.

दिल्लीकडे गमावण्यासारखे काहीच नाही, त्यामुळे कालच्या सामन्यात १६४ धावा करूनही त्यांनी बलाढ्य चेन्नईला पराभवाचा धक्का दिला होता. उद्याही ते असाच बिनधास्त खेळ करतील यात शंका नाही. त्यामुळे दडपण मुंबई इंडियन्सवरच असेल. मुळात हा सामना मुंबईकर विरुद्ध मुंबईकर असाही असेल. दिल्लीचे नेतृत्व करणारा श्रेयस अय्यर हा मूळचा मुंबईकर आहे. त्याच्या साथीला सलामीला मुंबईचा पृथ्वी शॉ आहे, तसेच प्रशिक्षकांच्या टीममध्ये प्रवीण अमरे हे आहेत.

चेन्नईविरुद्धच्या कालच्या सामन्यातील खेळपट्टी फिरकीस साथ देणारी होती. दिल्लीचा लेगस्पिनर अमित मिश्रा प्रभावी ठरला होता. त्यामुळे उद्या मुंबईला त्याच दृष्टीने संघरचना करावी लागेल. कुणाल पंड्या भरवसा दाखवत आहे, परंतु मयांक मार्कंडेला चांगली सुरवात करून पुढे सातत्य दाखवता आलेले नाही.

पंजाबला मोठा विजय आवश्‍यक
पुणे - किंग्ज इलेव्हन पंजाबसुद्धा प्लेऑफच्या शर्यतीत आहे; परंतु उद्या (ता. २०) चेन्नईविरुद्ध होणाऱ्या सामन्यात त्यांना मोठ्या फरकाने विजय आवश्‍यक आहे. दिल्लीकडून पराभूत झाल्यामुळे चेन्नई प्लेऑफपूर्वी विजयी मार्गावर येण्यास अधिक प्रयत्नशील असेल. त्यामुळे पंजाबसमोरचे आव्हान सोपे नसेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ipl 2018 mumbai indian delhi daredevils