esakal | लिलावात १६९ खेळाडूंसाठी ४३१ कोटींची बोली
sakal

बोलून बातमी शोधा

jaidev unadkat

जयदेव उनडकट याच्यावर भारतीय क्रिकेटपटूंमध्ये लागली सर्वाधिक बोली लागली. किंग्ज इलेव्हन पंजाब आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात उनाडकटला खरेदी करण्यासाठी चढाओढ सुरु होती. मात्र, राजस्थान रॉयल्सने अखेरीस बोली लावत त्याला 11.50 कोटींना खरेदी केले.

लिलावात १६९ खेळाडूंसाठी ४३१ कोटींची बोली

sakal_logo
By
वृत्तसंस्था

बंगळूर - इंडियन प्रीमियर लीगच्या नव्या मोसमातील खेळाडूंचा लिलाव रविवारी संपन्न झाला. दोन दिवस चाललेल्या या लिलावात १६९ क्रिकेटपटूंची खरेदी झाली आणि त्यासाठी तब्बल ४३१ कोटी ७० लाख रुपयांची उलाढाल झाली. अखेरच्या दिवशी जयदेव उनाडकट सर्वांत महागडा खेळाडू ठरला. टी २० क्रिकेटमधील ख्रिस गेल नावाच्या तुफानाला अखेर किंग्ज इलेव्हन पंजाबचा सहारा मिळाला. 

दोन दिवस चाललेल्या या ‘आयपीएल’ लिलावामध्ये भारतीय खेळाडूंचा बोलबाला राहिला. अनेक प्रथितयश खेळाडूंना या सर्वांत श्रीमंत मानल्या जाणाऱ्या लीगमध्ये सहभागी होण्यासाठी अखेरच्या क्षणापर्यंत वाट पाहावी लागली. यानंतरही खेळाडूंवर लागलेल्या बोली नक्कीच ‘आयपीएल’ची लोकप्रियता स्पष्ट करणाऱ्या ठरल्या.

अखेरच्या दिवशी डावखुरा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट सर्वांत महागडा ठरला. त्याला पुनरागमन करणाऱ्या राजस्थान रॉयल्सने ११.५ कोटी रुपयांना खरेदी केले. त्यामुळे ‘आयपीएल’मधील तो सर्वाधिक महागडा भारतीय खेळाडू ठरला. त्याने लोकेश राहुल आणि मनीष पांडे यांना मागे टाकले. उनाडकटवरील बोली साडेअकरा कोटी रुपयांवर थांबल्यामुळे सलग दुसऱ्या वर्षी बेन स्टोक्‍स सर्वांत महागडा खेळाडू ठरला. स्टोक्‍सला राजस्थाननेच १२.५ कोटी रुपयांना खरेदी केले. गतवर्षी स्टोक्‍ससाठी सर्वाधिक रक्कम पुणे फ्रॅंचाईजीने मोजली होती. अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज रशीद खानला हैदराबादने ‘आरटीएम’चा उपयोग करत ९ कोटी रुपये मोजले. 

चेन्नई, मुंबई, दिल्ली पूर्ण
दोन दिवसांच्या लिलावानंतर चेन्नई सुपर किंग्ज, दिल्ली डेअर डेव्हिल्स आणि मुंबई इंडियन्स यांनी २५ खेळाडूंचा कोटा पूर्ण केला. विशेष म्हणजे कोटा पूर्ण करूनही चेन्नईकडे अजून ६.५ कोटी रुपये शिल्लक राहिले आहेत. 

कोलकता मागे
कोलकता नाइट रायडर्स दोन दिवसांनंतर सर्वांत लहान संघ ठरला. त्यांनी दोन दिवसांत केवळ १९ खेळाडूंचीच निवड केली. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने २४ खेळाडूंची खरेदी केली.

गेल पंजाबकडे
टी २० क्रिकेटमध्ये गोलंदाजांचा कर्दनकाळ ठरणाऱ्या ख्रिस गेलला पहिल्या दिवशी कुणीच विचारात घेतले नाही. अखेरच्या दिवशी दोन्ही दिवशी बोली लावण्यात पुढे राहणाऱ्या किंग्ज इलेव्हन पंजाबने त्याला २ कोटी रुपयांना खरेदी केले. गेल्यावर्षी पदार्पणातच हॅट्ट्रिक घेणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या ॲण्ड्य्रू टायला पंजाबनेच ७.२ कोटी रुपये दिले. अफगाणिस्तानचा ऑफ स्पिनर मुजीब झारदानही (४ कोटी) पंजाबकडेच आला. अफगाणिस्तानचाच डावखुरा ‘चायनामन’ झहीर खान (६० लाख) राजस्थानकडे आला.

अखेरच्या दिवशी कर्नाटकचा फिरकी गोलंदाज कृष्णप्पा गौतमसाठी बंगळूर आणि राजस्थान यांच्यात स्पर्धा झाली. शेवटी तो राजस्थानचा ठरला. कॉरे अँडरसन (न्यूझीलंड), मोझेस हेन्‍रिकेज (ऑस्ट्रेलिया), रिषी धवन (भारत), टिमल मिल्स (इंग्लंड) या खेळाडूंना बोलीच लागली नाही.

नेपाळचा शिरकाव
या आयपीएलमधून नेपाळच्या खेळाडूंचाही शिरकाव झाला. लेगस्पिनर संदीरप लेमीछान हा आयपीएलमध्ये खेळणारा नेपाळचा पहिला खेळाडू ठरला, त्याला दिल्लीने २० लाख रुपयांना खरेदी केले.

loading image
go to top