'आयपीएल'च्या नव्या पर्वाची तयारी सुरू

वृत्तसंस्था
सोमवार, 22 मे 2017

'आयपीएल'च्या पुढील पर्वासाठी विविध निविदांची 'टाईमलाईन' निश्‍चित करण्यासाठी 'आयपीएल'च्या प्रशासकीय समितीची दोन दिवसांपूर्वी बैठक झाली. त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या प्रशासकांच्या समितीचे सदस्यही उपस्थित होते.

मुंबई: 'आयपीएल'चा दहावा मोसम संपल्यानंतर आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) या स्पर्धेच्या नव्या पर्वाची तयारीही सुरू केली आहे. 'आयपीएल'चे पहिले पर्व दहा वर्षांसाठी होते. या पर्वाची काल (रविवार) सांगता झाली. आता पुढील पर्वासाठी टेलिव्हिजन आणि डिजिटल हक्क विकण्यासाठी 'बीसीसीआय'ने 17 जुलैपासून प्रक्रिया सुरू करण्याचे जाहीर केले आहे. 

'आयपीएल'चे पहिले पर्व दहा वर्षांसाठी असले, तरीही यापुढे पाच वर्षांसाठीच हक्क विकले जाणार आहेत. सध्या या स्पर्धेच्या भारतातील प्रक्षेपणाचे हक्क 'सोनी'कडे होते; तर परदेशातील आणि डिजिटल प्रक्षेपणाचे हक्क 'स्टार इंडिया'कडे होते. वास्तविक, पुढील पर्वासाठीच्या निविदा प्रक्रियेस 'बीसीसीआय'ने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सुरवात केली होती. पण लोढा समिती आणि 'बीसीसीआय'मधील वादामध्ये या प्रक्रियेस खीळ बसली. 

'आयपीएल'च्या पुढील पर्वासाठी विविध निविदांची 'टाईमलाईन' निश्‍चित करण्यासाठी 'आयपीएल'च्या प्रशासकीय समितीची दोन दिवसांपूर्वी बैठक झाली. त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या प्रशासकांच्या समितीचे सदस्यही उपस्थित होते. 'आयपीएल'च्या मुख्य प्रायोजकासाठीची निविदा प्रक्रिया 31 मेपासून सुरू होईल. 

Web Title: IPL Broadcast rights bidding to start from July 17