ब्राव्होच्या वादळात मुंबई इंडियन्स गारद

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 8 April 2018

धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नईच्या संघाच्या या कामगिरीचे सगळीकडे कौतुक करण्यात येत आहे. धोनी, रैना, जडेजा यासारखे खेळाडू अपयशी ठरूनही चेन्नईने अशक्य असा हा विजय मिळविला. 

मुंबई - वानखेडेवर ड्‌वेन ब्राव्होचे वादळ आले आणि त्यामध्ये मुंबई इंडियन्सच्या आशाअपेक्षांचा पालापाचोळा झाला. पराभवाच्या खाईतून फिनिक्‍स भरारी घेणाऱ्या चेन्नईने यंदाच्या आयपीएलच्या सलामीलाच एक विकेट आणि एक चेंडू राखून थराराक विजय मिळवला. मुंबईचा विजय अखरेची तीन षटके शिल्लक असेपर्यंत निश्‍चित होता. पण ब्राव्होने असामान्य खेळी केली. त्यानंतर जखमी केदार जाधवने संयम राखत लक्ष्य पार केले. तत्पूर्वी मुंबईची सुरवात फारच निराशाजनक होती. रोहित शर्माला प्रयत्न करूनही वेग वाढवता येत नव्हता. त्यातच दुसरा सलामीवीर एर्विनही झटपट बाद झाला होता. २ बाद २० अशा अवस्थेनंतर ईशान किशान आणि सूर्यकुमार यादव यांनी ५२ चेंडूंत ७८ धावांची भागीदारी करून गाडी रुळावर आणली. त्यानंतर कुणाल पंड्याचा धावांचा तडाखा मुंबईला १६५ धावांपर्यंत नेणारा ठरला.  संक्षिप्त धावफलक - मुंबई ः २० षटकांत ४ बाद १६५ (रोहित १५, ईशान किशान ४०, सूर्यकुमार ४३, हार्दिक पंड्या नाबाद २२,  कुणाल पंड्या नाबाद ४१, वॉटसन २-२९, दीपक चहर १-१४) पराभूत वि. चेन्नई - १९.५ षटकांत ९ बाद १६९ (रायडू २२, धोनी ५, ब्राव्हो ६८-३० चेंडू, ३ चौकार, ७ षटकार, केदार नाबाद २४ -२२ चेंडू, १ चौकार, २ षटकार, हार्दिक पंड्या ३-२४, मयांक मारकंडे ३-२३)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: IPL Chennai Super Kings beat Mumbai Indians by 1 wicket