आयपीएलचे ‘किंग’ कोण ?

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 27 May 2018

मुंबई - भारतीय क्रिकेटच्या पंढरीत हवामान तापले आहे, तसा आयपीएलच्या अंतिम सामन्याचा ज्वरही कमालीचा चढला आहे. वानखेडे स्टेडियमवर उद्या (ता. २७) त्यात हाय व्होल्टेज महामुकाबल्याची भर पडेल आणि त्यातून निश्‍चित होईल यंदाच्या आयपीएलचा विजेता. धोनीच्या चेन्नईचे धुरंधर आणि रशीद खानच्या एकहाती करामतीच्या जोरावर आशा उंचावलेल्या हैदराबादचे नवाब आमने-सामने येत आहेत. दोन्हीही संघ कंबर कसून तयार आहेत.

मुंबई - भारतीय क्रिकेटच्या पंढरीत हवामान तापले आहे, तसा आयपीएलच्या अंतिम सामन्याचा ज्वरही कमालीचा चढला आहे. वानखेडे स्टेडियमवर उद्या (ता. २७) त्यात हाय व्होल्टेज महामुकाबल्याची भर पडेल आणि त्यातून निश्‍चित होईल यंदाच्या आयपीएलचा विजेता. धोनीच्या चेन्नईचे धुरंधर आणि रशीद खानच्या एकहाती करामतीच्या जोरावर आशा उंचावलेल्या हैदराबादचे नवाब आमने-सामने येत आहेत. दोन्हीही संघ कंबर कसून तयार आहेत.

यंदाच्या आयपीएलमध्ये गटसाखळीतील पहिल्या दोन संघांतच अंतिम सामनाही होत आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर याच दोन संघांत मंगळवारी कॉलिफायरचा सामना झाला होता. त्यामध्ये चेन्नईने विजय मिळवला होता; परंतु उद्याचा सामना हा विजेतेपदाचा असल्यामुळे पारडे समान असेल. शिवाय झालेल्या चुकांपासून बोध घेतल्यास सनरायझर्सचा विजेतेपदाचा सूर्योदय होण्यास वेळ लागणार नाही.

वानखेडेवर याच हैदराबाद संघाने मुंबई इंडियन्सविरुद्ध ११८ ही धावसंख्या निर्णायक ठरवली होती. तसेच कॉलिफायरच्या सामन्यात १३९ धावांवरही विजय आवाक्‍यात आणला होता. त्यामुळे आत्मविश्‍वासाचे पारडे त्यांच्या बाजूलाही झुकलेले आहे. वास्तविक गोलंदाजीच्या जोरावरच हैदराबादने अंतिम सामन्यापर्यंत मजल मारलेली आहे.

आमने-सामने
चेन्नई आणि हैदराबाद यांच्यात आयपीएलमध्ये पाच लढती झाल्या आहेत. यातील एकच लढत हैदराबादला जिंकता आलेली आहे. यंदाच्या मोसमातील तिन्ही लढतींत चेन्नईने बाजी मारलेली आहे.

हैदराबादची कमकुवत फलंदाजी
हैदराबादने अंतिम सामन्यापर्यंत मजल मारली तरी त्यांची फलंदाजी बेभरवशाचीच राहिलेली आहे. कर्णधार केन विल्यमसन आणि काही प्रमाणात शिखर धवनचा अपवाद वगळता इतरांनी घोर निराशा केली आहे. यामध्ये मनीष पांडे आणि युसूफ पठाण यांचा समावेश आहे. कालच्या सामन्यात तर मनीष पांडेला वगळण्यात आले होते. मधल्या फळीने योगदान दिले तर हैदराबादला आयपीएलचे दुसऱ्यांदा विजेतेपद मिळवता येऊ शकेल.

रशीद खान विरुद्ध धोनी
अंतिम सामना धोनीच्या सहकाऱ्यांची फलंदाजी वि. रशीद खान असाच असणार आहे. कोलकताविरुद्ध रशिदने एकहाती कलाटणी दिली होती. रशिद प्लेऑफमध्येही धोनीच्या धुरंधरांना भारी ठरला होता. धोनीला त्याचा गुगली कळलाच नव्हता. रशिदविरुद्ध रणनीतीवर चेन्नईच्या फलंदाजीचे भवितव्य असेल. रशीदचे कोडे सोडवण्यासाठी शनिवारी धोनीने त्याच्या संघात असलेल्या आफ्रिकन लेगस्पिनर इम्रान ताहिरविरुद्ध नेटमध्ये सराव केला.

आयपीएलचे विजेते
चेन्नई - २०१०, २०११
हैदराबाद - २०१६


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: IPL Cricket Final Match Chennai and Hyderabad