चेन्नई सुपर किंग्जचे सामने आता होणार पुण्यात

मुकुंद पोतदार
Thursday, 12 April 2018

मध्यवर्ती ठिकाण
विशाखापट्टणमसह इतर तीन शहरांना थेट विमानसेवा पुण्याच्या तुलनेत कमी प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळेसुद्धा पुण्याला पसंती मिळाली.
चेन्नईचा घरच्या मैदानावरील पुढचा सामना २० एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्सविरुद्ध असून, तो पुण्यात खेळविला जाईल.

पुणे - कावेरी पाणीवाटप तंट्यावरून चेन्नईत आंदोलने सुरू असल्यामुळे आयपीएलचे तेथील सामने अन्यत्र घेणे संयोजकांना भाग पडले आहे. नवे केंद्र म्हणून पुण्याला पसंती मिळाली असून, त्यावर आज (गुरुवार) शिक्कामोर्तब झाले.

चेन्नईच्या मंगळवारी झालेल्या पहिल्या सामन्याच्यावेळीच निदर्शने झाली. कोलकाता संघाला स्टेडियमवर पोचण्यास उशीर झाला. त्यामुळे सामना १३ मिनिटे उशिरा सुरू झाला. त्यानंतर रवींद्र जडेजा व फाफ डू प्लेसी यांच्या दिशेने बूट भिरकाविण्यात आला. नवा पक्ष स्थापन केलेल्या रजनीकांत यांच्यासह तमिळनाडूतील अनेक नेत्यांनी सामन्यांना विरोध केला आहे. अशा परिस्थितीत सुरक्षा व्यवस्था पुरविण्यास चेन्नई पोलिसांनी असमर्थता दर्शविली आहे.

या पार्श्वभूमीवर आपला तळ पुण्याला हलविण्याचा निर्णय बीसीसीआयकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे आता पुण्यात आयपीएलचे आठ सामने होणार आहेत. चेन्नईने घरच्या मैदानावर खेळणारे सहा आणि प्ले ऑफच्या दोन लढतींचा यामध्ये समावेश असणार आहे.

याविषयी महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अॅड. अभय आपटे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, की चेन्नईचे सीईओ काशी विश्वनाथन, आयपीएलचे सीओओ हेमांग अमीन, प्रशासकीय समितीचे विनोद राय, बीसीसीआय सीईओ राहुल जोहरी यांच्याशी माझी बुधवारी सायंकाळी चर्चा झाली. सामने चेन्नईतच होणे आपल्याला आवडेल, पण वेळ आल्यास आम्ही संयोजन करण्यास सज्ज आहोत, अशी भूमिका मी मांडली. गुरुवारी प्रशासकीय समिती अंतिम निर्णय घेईल. ही बैठक मुंबईत प्रत्यक्ष किंवा टेलिकॉन्फरन्सच्या माध्यमातून होईल.

गेल्या मोसमात पहिल्या सामन्याच्यावेळी धोनीचे मैदानावर आगमन झाले तेव्हा पुणेकर क्रिकेटप्रेमींनी त्याच्या नावाचा जयघोष करीत आसमंत दणाणून सोडला होता. येथे खेळण्याचा दोन मोसमांचा; तसेच आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव असल्यामुळे धोनीने पुण्याला पसंती दिली. त्याला येथील मैदानाची समीकरणे तोंडपाठ आहेत.

मध्यवर्ती ठिकाण
विशाखापट्टणमसह इतर तीन शहरांना थेट विमानसेवा पुण्याच्या तुलनेत कमी प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळेसुद्धा पुण्याला पसंती मिळाली. चेन्नईचा घरच्या मैदानावरील पुढचा सामना २० एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्सविरुद्ध असून, तो पुण्यात खेळविला जाईल.

वेळापत्रक पुढीलप्रमाणे -
- चेन्नई सुपर किंग्ज वि. राजस्थान रॉयल्स - 20 एप्रिल
- चेन्नई सुपर किंग्ज वि. मुंबई इंडियन्स - 28 एप्रिल
- चेन्नई सुपर किंग्ज वि. दिल्ली डेअरडेव्हिल्स - 30 एप्रिल
- चेन्नई सुपर किंग्ज वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळूर - 5 मे
- चेन्नई सुपर किंग्ज वि. सन रायझर्स हैदराबाद - 13 मे
- चेन्नई सुपर किंग्ज वि. किंग्ज इलेव्हन पंजाब - 20 मे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: IPL premier league cricket chennai super kings matches now in Pune