चेन्नईचा दमदार विजय

मुकुंद पोतदार
Sunday, 6 May 2018

पुणे - चेन्नईने आयपीएलमध्ये शनिवारी बंगळूरला सहा विकेट राखून हरविले. धोनीची यष्टीरक्षणातील चपळाई अन्‌ फलंदाजीतील टोलेबाजी तसेच रवींद्र जडेजाची जादुई फिरकी हाउसफुल गर्दी केलेल्या प्रेक्षकांसाठी पैसा वसूल मनोरंजन ठरली.

पुणे - चेन्नईने आयपीएलमध्ये शनिवारी बंगळूरला सहा विकेट राखून हरविले. धोनीची यष्टीरक्षणातील चपळाई अन्‌ फलंदाजीतील टोलेबाजी तसेच रवींद्र जडेजाची जादुई फिरकी हाउसफुल गर्दी केलेल्या प्रेक्षकांसाठी पैसा वसूल मनोरंजन ठरली.

प्रथम फलंदाजीचे आमंत्रण मिळालेल्या बंगळूरला १२७ धावांपर्यंत मजल मारता आली. चेन्नईने दोन षटके शिलकीत ठेवून हे माफक आव्हान पार केले. वॉट्‌सनने साऊदीचा पहिलाच चेंडू सीमापार केला, पण चहलच्या चेंडूवर त्याचा त्रिफळा उडाला. रायुडू-रैना यांनी ४४ धावांची भर घातली. सहाव्या षटकात साऊदीकडून १६ धावा गेल्या. यात रायुडूने दोन चौकार व एक षटकार मारला. त्यानंतर चेन्नईने तीन विकेट गमावल्या. धोनीने चहलला तीन षटकार खेचत प्रेक्षकांना जल्लोषाची संधी दिली. बंगळूरच्या साऊदी व चहल यांची धुलाई विराटसाठी निराशाजनक ठरली.

तत्पूर्वी, फलंदाजीत मॅक्‌लमने पुन्हा अपेक्षाभंग केला. एन्गिडीला आक्रमक फटका मारण्याची चूक त्याला भोवली. शार्दूल ठाकूरने दुसऱ्या प्रयत्नात झेल टिपला. त्यानंतर विराटचे टाळ्यांच्या गजरात आगमन झाले. पार्थिवने एन्गिडीला दोन चौकार, तर विलीला एक षटकार खेचत सूत्रे आपल्याकडे ठेवली. विराटने शार्दूलला चौकार मारला, पण जडेजाच्या पहिल्याच चेंडूवर काही कळायच्या आत त्याचा त्रिफळा उडविला.

दुसरा फिरकी गोलंदाज हरभजनचेही पहिले षटक नाट्यमय ठरले. पार्थिवने पहिला चेंडू रीव्हर्सस्वीपवर सीमापार केला. दुसऱ्या चेंडूवर हरभजनकडून झेल सुटला आणि एक धाव गेली. टाळ्यांच्या गजरात आगमन झालेल्या डिव्हिलर्सने घोर निराशा केली. काहीशा स्वैर चेंडूवर स्वीपच्या प्रयत्नात तो चकला, पण धोनीने मात्र न चुकता नेहमीची चपळाई दाखवित त्याला यष्टीचीत केले.

यानंतर पार्थिव अर्धशतकाकडे आगेकूच करीत असताना इतर सहकारी हजेरी लावून परतत होते. जडेजानेच पार्थिवला स्वतःच्याच चेंडूवर टिपले. निम्मा संघ ८४ धावांत गारद झाल्यानंतर आणखी तीन बळी केवळ चार धावांत पडले. त्या वेळी बंगळूरची ८ बाद ८९ अशी दूरवस्था झाली होती. नवव्या क्रमांकावर साऊदीने आक्रमक खेळी केल्यामुळेच बंगळूरला सव्वाशेचा टप्पा तरी पार करता आला.

संक्षिप्त धावफलक 
रॉयल चॅलेंजर्स बंगळूर - २० षटकांत ९ बाद १२७ (पार्थिव पटेल ५३-४१ चेंडू, ५ चौकार, २ षटकार, टीम साऊदी नाबाद ३६-२६ चेंडू, ३ चौकार, १ षटकार, रवींद्र जडेजा ३-१८, हरभजन सिंग २-२२) पराभूत विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज - १८ षटकांत ४ बाद १२८ (वॉट्‌सन ११, अंबाती रायुडू ३२-२५ चेंडू, ३ चौकार, २ षटकार, सुरेश रैना २५-२१ चेंडू, २ चौकार, १ षटकार, धोनी नाबाद ३१-२३ चेंडू, १ चौकार, ३ षटकार, उमेश यादव २-१५, कॉलीन डी ग्रॅंडहोम १-१६)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: IPL Premier League Cricket Competition