मुंबई इंडियन्सच्या जिवात जीव

शैलेश नागवेकर
Monday, 7 May 2018

मुंबई - यंदाच्या आयपीएल मोसमात हेलकावे खात असलेल्या मुंबई इंडियन्सने रविवारी कोलकताविरुद्ध अडकलेला श्‍वास अखेर मोकळा केला आणि कसाबसा १३ धावांनी विजय मिळवत आयपीएलमधील आव्हान कायम ठेवले. मुंबईचा दहा सामन्यांतील हा चौथा विजय आहे. 

मुंबई - यंदाच्या आयपीएल मोसमात हेलकावे खात असलेल्या मुंबई इंडियन्सने रविवारी कोलकताविरुद्ध अडकलेला श्‍वास अखेर मोकळा केला आणि कसाबसा १३ धावांनी विजय मिळवत आयपीएलमधील आव्हान कायम ठेवले. मुंबईचा दहा सामन्यांतील हा चौथा विजय आहे. 

वेगवान सुरवातीनंतर १८१ धावाच करू शकलेल्या मुंबईने कोलकत्याचे सलामीवीर पाठोपाठ बाद केले, पण रॉबीन उथप्पाचा चार धावांवर मार्कंडेने झेल सोडला. त्यानेच ३५ चेंडूंत ५४ धावांची खेळी करून मुंबईच्या जखमेवर मीठ चोळले. अखेर मार्केंडेने उथप्पाला बाद केले. तेथूनच मुंबईच्या गोलंदाजांनी नाड्या आवळल्या. दिनेश कार्तिक आणि आंद्रे रसेलच्या आक्रमकतेला वेसण घालण्यास मुंबई यशस्वी ठरले. रसेलचा कुणाल पंड्याने पकडलेला झेल सामना मुंबईच्या बाजूने झुकविणारा ठरला. 

भर उन्हात प्रथम फलंदाजी मिळालेल्या मुंबईचा सूर्य (सूर्यकुमार यादव) चांगलाच तळपला. पहिल्या दोन षटकांत अवघ्या आठच धावा झाल्यानंतर हाच सूर्य मध्यान्ही आला आणि त्याने कोलकता गोलंदाजांवर हल्ला सुरू केला. कोलकता कर्णधार कार्तिकने सुनील नारायण हे हुकमी अस्त्र चौथ्याच षटकात वापरले; परंतु वेस्ट इंडीजच्याच एविन लुईसने त्याला लक्ष्य केले. मुंबईचा धावफलक झपाट्याने धावू लागला. सूर्या आणि लुईसचा स्ट्राइक रेट दीडशेच्या पलीकडे होता. अखेर सुनीलनेच लुईसची खेळी संपवली, परंतु तोपर्यंत मुंबईने ९.२ षटकांत ९१ धावा केल्या होत्या. या सरासरीने मुंबईने दोनशेपर्यंत मजल मारायला हवी होती; परंतु नारायणने रोहित शर्माला बाद केल्यावर मुंबईचा वेग मंदावला. अर्धशतकी खेळी करून ‘सूर्य’ मावळल्यानंतर तर द्विशतकी धावसंख्येच्या आशाच दुरावल्या. 

मुंबई इंडियन्स (२० षटकांत) - ४ बाद १८१ (सूर्यकुमार यादव ५९  - ३९ चेंडूंत ७ चौकार व २ षटकार, एविन लुईस ४३ - २८ चेंडूंत ५ चौकार व २ षटकार, हार्दिक पंड्या नाबाद ३५ - २० चेंडूंत ४ चौकार व १ षटकार, सुनील नारायण २-३५, आंद्रे रसेल २-१२) 
विजयी विरुद्ध कोलकता (२० षटकांत) - ६ बाद १६८ (ख्रिस लीन १७ -१३  चेंडूंत ४ चौकार, रॉबीन उथप्पा ५४ -३५ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकार, नितीश राणा ३१- २७ चेंडूंत ३ चौकार व १ षटकार, दिनेश कार्तिक नाबाद ३६- २६ 
चेंडूंत ५ चौकार व १ षटकार, मॅक्‍लेघन १-३०, बुमरा १-३४, हार्दिक पंड्या २-१९).


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: IPL Premier League Cricket Competition