कोलकत्यात ‘ईशान’ वादळ

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 10 May 2018

कोलकता - गाडी बंद पडण्याची स्थिती आल्यावर त्याच गाडीला फेरारीचा वेग देण्याची कला अवगत असलेल्या मुंबई इंडियन्सने बुधवारी कोलकताचा त्यांच्याच ईडन गार्डनवर अक्षरशः धुव्वा उडवला. मुंबईने १०२ धावांनी भला मोठा विजय मिळवत यंदाच्या आयपीएलमधील आव्हानाला बळकटी दिली. पुढचे तिन्ही सामने जिंकले तर मुंबईला प्लेऑफ गाठता येणार आहे.

कोलकता - गाडी बंद पडण्याची स्थिती आल्यावर त्याच गाडीला फेरारीचा वेग देण्याची कला अवगत असलेल्या मुंबई इंडियन्सने बुधवारी कोलकताचा त्यांच्याच ईडन गार्डनवर अक्षरशः धुव्वा उडवला. मुंबईने १०२ धावांनी भला मोठा विजय मिळवत यंदाच्या आयपीएलमधील आव्हानाला बळकटी दिली. पुढचे तिन्ही सामने जिंकले तर मुंबईला प्लेऑफ गाठता येणार आहे.

उत्तरेकडे धुळीचे वादळ तडाखा देत असताना कोलकतातील ईडन गार्डनवर ईशान किशनच्या तुफानी टोलेबाजीच्या वादळाने कोलकता संघाच्या गोलंदाजीची धूळधाण उडवली. बाद होण्यापूर्वीच्या अखेरच्या सात चेंडूंत त्याने ३० धावा अशी एकूण २१ चेंडूंत ६२ धावांची खेळी साकारली. त्यामुळे मुंबईने प्रथम फलंदाजी करताना २१० धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर कोलकताला १०८  धावांत गुंडाळले. कोलकताकडे ताकदवर फलंदाज आहेत; पण त्यांनी शरणागती स्वीकारली. मुंबईच्या प्रत्येक गोलंदाजांनी यश मिळवले.

आव्हानाचा पाठलाग करताना कोलकत्त्याच्या फलंदाजांनी सुरवातीपासूनच नांगी टाकली. धावांचे आणि बरोबरीने वाढलेल्या आवश्‍यक धावगतीचे दडपण त्यांना पेलवले नाही. एकवेळ ७ बाद ७६ या अवस्थेनंतर त्यांनी शतकी मजल मारता आली हेच त्यांच्यासाठी समाधान होते. 

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी मिळालेल्या मुंबईची सुरवात सावध होती. सुर्यकुमार यादव नेहमीसारखा आक्रमक खेळत होता. दिनेश कार्तिकने सुर्यकुमार आणि लुईस या मुंबईच्या फलंदाजांना रोखण्यासाठी सुनील नारायण आणि पियुष चावला असा दुहेरी फिरकी मारा सुरू केला. सुनील नारायण, पीयूष चावला यांच्या फिरकीसमोर त्यांना फटकेबाजी करता येत नव्हती. धावगती सातच्या आसपास होती. पियुष चावलाने फटकेबाजीच्या मोहात सापडलेल्या लुईस आणि सुर्यकुमार यांना बाद केले. त्यानंतर रोहित शर्मा आणि इशान किशन ही जोडी काहीशी संथ खेळत होती. त्यामुळे परिस्थिती बिकट होणार असे चित्र होते, परंतु  चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या ईशान किशनने १४ चेंडूंत ३२ धावा केल्या होत्या; परंतु डावाच्या १४ व्या षटकांत त्याने कुलदीप यादवची केलेली धुलाई अफलातूनच होती. सलग चार षटकार खेचले.

त्यानंतर नारायणचाही एक चेंडू प्रेक्षकांमध्ये भिरकावला. त्या वेळी त्याचा स्ट्राइक रेट ३११ चा होता. अवघ्या सात चेंडूंत त्याने ३० धावांचा महापूर आणला आणि मुंबईला द्विशतकी धावांचे स्वप्न दिसू लागले. किशनपासून प्रेरणा घेत हार्दिक पंड्या आणि बेन कटिंग यांनी कोलकत्याच्या गोलंदाजींची धुलाई केली.  

संक्षिप्त धावफलक -
मुंबई - २० षटकांत ६ बाद २१० (सूर्यकुमार यादव ३६, रोहित शर्मा ३६, ईशान किशन ६२ -२१ चेंडू, ५ चौकार, ६ षटकार, बेन कटिंग २४ -९ चेंडू, १ चौकार, ३ षटकार, सुनील नारायण १-२३, पीयूष चावला ३-४८) वि. वि. कोलकता १८.१ षटकांत सर्वबाद १०८ (ख्रिस लीन २१ -१५ चेंडू, ३ चौकार, १  षटकार, नितीश राणा २१ -१९ चेंडू, २ चौकार, १ षटकार, मॅक्‍लेघन १-२३, हार्दिक पंड्या १-१२, बुमरा १-१७, कृणाल पंड्या २-१६, मार्कंडे १-२६).


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: IPL Premier League Cricket Competition Calcutta Mumbai Indians