सनरायझर्सनी आव्हानांचा पाठलागही करून दाखवला

सकाळ वृत्तसेवा
Monday, 7 May 2018

यंदाच्या आयपीएल मोसमात सनरायझर्स हैदराबाद खऱ्या अर्थाने जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. प्रथम त्यांनी आपल्या कमी धावसंख्येचा यशस्वी बचाव केला. त्यानंतर दिल्लीविरुद्ध त्यांनी आपण आव्हानाचा पाठलागही करू शकतो, हे दाखवून दिले. 

यंदाच्या आयपीएल मोसमात सनरायझर्स हैदराबाद खऱ्या अर्थाने जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. प्रथम त्यांनी आपल्या कमी धावसंख्येचा यशस्वी बचाव केला. त्यानंतर दिल्लीविरुद्ध त्यांनी आपण आव्हानाचा पाठलागही करू शकतो, हे दाखवून दिले. 

दिल्लीचे आव्हान तसे मोठे नव्हते. त्यांना षटकामागे आठ धावा करायच्या होत्या. पण, तरीही हैदराबाद संघाच्या  खेळाडूंनी आवश्‍यक धावांची गती वाढल्यानंतरही आम्ही खेळू शकतो, हे दाखवून दिले. त्यांचा कर्णधार केन विल्यम्सन सर्व खेळाडूंना एकत्र बांधून ठेवण्यात यशस्वी ठरतोय. एका संघातून केवळ चारच परदेशी खेळाडू खेळू शकतात, या नियमामुळे विल्यम्सन गेल्या वर्षी खूप सामने खेळू शकला नव्हता. त्या वेळी कर्णधार डेव्हिड वॉर्नरने फलंदाजांना झुकते माप दिले होते.

या वेळी वॉर्नर नसतानाही विल्यम्सनने कर्णधारपदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळताना अनेक वेळा संघाच्या खेळाचा दर्जा उंचावला. त्यांचे फलंदाज धडाकेबाज खेळ दाखवू शकले नाहीत. त्यांच्या फलंदाजीत सातत्यही दिसून आले नाही. यानंतरही जेव्हा परिस्थिती संघाच्या विरुद्ध असते तेव्हाही विल्यम्सन कमालीचा शांत राहिला. अगदी धोनीचा भास त्याच्या देहबोलीतून होत होता. 

दुसरीकडे बंगळूर संघाला आता पहिल्या चारमध्ये यायचे असेल, तर प्रत्येक सामना जिंकावा लागणार आहे. चेन्नईविरुद्ध त्यांच्या खेळातून असे कुठेच जाणवले नाही. 

चेन्नईविरुद्धची त्यांची धावसंख्या ही त्यांना नेट रन वाढविण्यासाठीही पुरेशी ठरली नाही. त्यात खराब क्षेत्ररक्षणाचाही फटका त्यांना बसला. सोपे झेल सोडल्यामुळे चेन्नईला एक षटक राखून विजय मिळविणे शक्‍य झाले. त्यांची फलंदाजीची ताकद लक्षात घेता त्यांना प्रथमच १८०च्या पुढे जाता आले नाही. त्यांची गोलंदाजीदेखील गेल्या वर्षीसारखी सर्वोत्तम नाही. 

सनरायझर्स हैदराबाद संघ ही विजयी मालिका कायम राखण्यासाठी निश्‍चितच उत्सुक असेल, त्याच वेळी बंगळूर संघ आपल्या प्रवासात अडथळा ठरू नये, असेच अन्य संघांना वाटत असेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: IPL Premier League Cricket Competition Sunil Gavaskar