शेष भारताने इराणी करंडक जिंकला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जानेवारी 2017

साहाच्या नाबाद द्विशतकी खेळीला, पुजाराची शतकी साथ
मुंबई - प्रथम श्रेणी क्रिकेटमधील आपली सर्वोत्तम द्विशतकी खेळी करणाऱ्या वृद्धिमान साहाने शतकवीर कर्णधार चेतेश्‍वर पुजारासह शेष भारताला इराणी करंडक जिंकून दिला. पहिल्या तीन दिवसांवर वर्चस्व राखूनही रणजी विजेत्या गुजरातचे आणखी एक यश मिळवण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले.

साहाच्या नाबाद द्विशतकी खेळीला, पुजाराची शतकी साथ
मुंबई - प्रथम श्रेणी क्रिकेटमधील आपली सर्वोत्तम द्विशतकी खेळी करणाऱ्या वृद्धिमान साहाने शतकवीर कर्णधार चेतेश्‍वर पुजारासह शेष भारताला इराणी करंडक जिंकून दिला. पहिल्या तीन दिवसांवर वर्चस्व राखूनही रणजी विजेत्या गुजरातचे आणखी एक यश मिळवण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले.

साहाने नाबाद 203; तर पुजाराने नाबाद 116 धावांची खेळी केली आणि शेष भारताने पाचव्या दिवशी उपाहारापूर्वीच मोहीम फत्ते केली.

विजयासाठी आवश्‍यक असलेल्या 379 धावा चार फलंदाजांच्या मोबदल्यात आणि 103 षटकांत पूर्ण केल्या. साहा-पुजारा यांनी नाबाद 316 धावांची भागीदारी केली.

चौथ्या दिवसअखेरीस 4 बाद 63 अशा संकटात सापडलेला आपला डाव साहा आणि पुजारा यांनी सावरताना दिवसअखेर 266 धावांपर्यंत मजल मारली. तेथेच सामना शेष भारताच्या बाजूने झुकला होता. आज उर्वरित 113 धावा करण्यासाठी त्यांना 19.1 षटकांचा खेळ पुरेसा ठरला. दडपण झुगारण्यासाठी स्वीकारलेला आक्रमक पवित्रा आजही साहाने कायम ठेवला. विजय निश्‍चित झाल्यावर पुजाराने चांगली फटकेबाजी केली. हार्दिक पटेलचा चेंडू पुढे सरसावत सीमारेषेवर मारून त्यानेच विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

रणजी विजेते आणि उर्वरित राज्यांच्या संघामधून निवडला जाणारा संघ यांच्यामध्ये होणारा इराणी करंडकाचा सामना गेल्या 19 स्पर्धांपैकी 15 वेळा शेष भारताने जिंकला आहे.

इराणी करंडक सामन्यातील साहा-पुजारा यांची 316 धावांची भागीदारी ही इराणी सामन्यातील सर्वोत्तम दुसऱ्या क्रमांकाची भागीदारी ठरली. सर्वाधिक 327 धावांची भागीदारी मुंबईकडून रवी शास्त्री-प्रवीण अमरे यांनी बंगळूरूमध्ये 1990-91 मध्ये शेष भारत संघाविरुद्ध केलेली आहे.

सांघिक खेळामुळे विजय साकारला. साहाचा आक्रमक पवित्रा धावांचा पाठलाग करताना निर्णायक ठरला. मोठ्या धावसंख्येचे आव्हान असताना चांगली सुरवात मिळणे अपेक्षित होते; पण तसे झाले नाही. साहाने मला एका बाजूने किल्ला लढवण्यास सांगितले आणि स्वतः प्रतिहल्ला करण्याचे धोरण स्वीकारले.
- चेतेश्‍वर पुजारा, कर्णधार शेष भारत

विजयाचे सर्व श्रेय साहा आणि पुजारा यांना जाते, पहिले चार फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर त्या दोघांनीच संघाला विजयापर्यंत नेले. आमची गोलंदाजी काहीशी अनुभवात कमी होती. आता राष्ट्रीय एकदिवसीय स्पर्धेत रणजी स्पर्धेसारखी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करणार आहोत.
- पार्थिव पटेल, कर्णधार, गुजरात

संक्षिप्त धावफलक
गुजरात, पहिला डाव - 358 आणि दुसरा डाव - 246
शेष भारत, पहिला डाव - 226 आणि दुसरा डाव - 4 बाद 379 (चेतेश्‍वर पुजारा नाबाद 116 -238 चेंडू, 16 चौकार, वृद्धिमन साहा नाबाद 203 -272 चेंडू, 26 चौकार, 6 षटकार)

Web Title: irani karandak win by india