विराटऐवजी अय्यरला संधीची अपेक्षा

वृत्तसंस्था
मंगळवार, 8 मे 2018

अफगाणिस्तानविरुद्धच्या ऐतिहासिक कसोटी क्रिकेट सामन्यासाठी भारतीय संघाची निवड मंगळवारी होईल. कौंटीतील पदार्पणात व्यग्र राहणाऱ्या विराट कोहलीऐवजी मुंबईच्या श्रेयस अय्यरला संधी मिळण्याची अपेक्षा आहे. 14 जूनपासून बंगळूरमधील चिन्नास्वामी स्टेडियवर सुरू होणाऱ्या कसोटीत मुंबईकर अजिंक्‍य रहाणे नेतृत्व करेल. 

बंगळूर - अफगाणिस्तानविरुद्धच्या ऐतिहासिक कसोटी क्रिकेट सामन्यासाठी भारतीय संघाची निवड मंगळवारी होईल. कौंटीतील पदार्पणात व्यग्र राहणाऱ्या विराट कोहलीऐवजी मुंबईच्या श्रेयस अय्यरला संधी मिळण्याची अपेक्षा आहे. 14 जूनपासून बंगळूरमधील चिन्नास्वामी स्टेडियवर सुरू होणाऱ्या कसोटीत मुंबईकर अजिंक्‍य रहाणे नेतृत्व करेल. 

विराट जून महिन्यात सरेकडून खेळेल. त्यामुळे तो आयर्लंडविरुद्ध डब्लीनला होणाऱ्या दोन टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांनाही मुकेल. त्या वेळी नेतृत्वाची धुरा रोहित शर्मा याच्याकडे असेल. विराट वगळता कसोटी संघातील सर्व नियमित खेळाडू अफगाणिस्तानविरुद्ध मैदानावर उतरतील. यात चेतेश्‍वर पुजारा आणि इशांत शर्मा यांचाही समावेश असेल. हे दोघे सध्या कौंटी क्रिकेट खेळत आहेत. पुजारा यॉर्कशायरकडून 11 ते 14 मे दरम्यान सरेविरुद्ध खेळेल. इशांत सरेकडून याच कालावधीत केंटविरुद्ध खेळेल. याविषयी काही प्रसार माध्यमांनी चुकीची माहिती दिली होती, असे "बीसीसीआय'च्या पदाधिकाऱ्याने स्पष्ट केले. 

निवड समितीच्या एका सदस्याने संगितले, की "आमच्याकडे समान पर्यायी खेळाडू उपलब्ध आहेत. विराटला अय्यर, जडेजाला अक्षर पटेल, हार्दिक पंड्याला विजय शंकर अशा खेळाडूंमुळे संघाचे स्वरूप बदलणार नाही.' निवड समिती झटपट क्रिकेटसाठी मुख्य संघ निवडेल. त्यात "आयपीएल'मधील कामगिरीमुळे अंबाती रायुडूला संधी मिळू शकते. 

"अ' संघाचीही निवड 

याशिवाय इंग्लंड दौऱ्यासाठी "अ' संघाचीही निवड होईल. त्यात वातावरणाशी जुळवून घेण्याच्या उद्देशाने कसोटी संघातील काही "स्पेशालिस्ट'ची निवड होऊ शकते. राहुल द्रविड मार्गदर्शक असलेल्या संघात प्रतिभाशाली पृथ्वी शॉ, शुबमन गील आणि शिवम मावी यांना संधी मिळू शकते. "अ' संघाचा वेस्ट इंडिज "अ' आणि इंग्लंड "अ' यांच्यासह तिरंगी स्पर्धेत सहभाग असेल. त्याशिवाय चार दिवसांची एक कसोटी वुर्स्टरमध्ये होईल. 

अय्यरसमोर चुरस 

कसोटी पदार्पणासाठी अय्यरला चुरशीला सामोरे जावे लागेल. गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्ध धरमशाला कसोटीच्या वेळी विराटच्या खांद्याला दुखापत झाली, तेव्हा अय्यरची निवड झाली होती; पण अंतिम संघात कुलदीप यादवला पसंती देण्यात आली. कुलदीपने भरीव कामगिरी केली. अय्यरने 46 प्रथमश्रेणी सामन्यांत 53.90 च्या सरासरीने 3989 धावा केल्या आहेत. मुरली विजय, शिखर धवन, के. एल. राहुल, चेतेश्‍वर पुजारा आणि कर्णधार रहाणे यांचे स्थान नक्की असल्यामुळे अय्यर आणि रोहित शर्मा यांच्यात चुरस असेल. रोहितची कसोटीतील कामगिरी मात्र सामान्य दर्जाची झाली आहे. 

Web Title: Iyer expected of opportunity instead of Virat