जेम्स अँडरसन भारताविरुद्ध खेळणार!

वृत्तसंस्था
रविवार, 6 नोव्हेंबर 2016

राजकोट : बांगलादेशकडून कसोटीत पराभव झाल्याच्या धक्‍क्‍यातून सावरणाऱ्या इंग्लंडला जेम्स अँडरसनच्या संभाव्य पुनरागमनाच्या शक्‍यतेमुळे बळ मिळाले आहे.

राजकोट : बांगलादेशकडून कसोटीत पराभव झाल्याच्या धक्‍क्‍यातून सावरणाऱ्या इंग्लंडला जेम्स अँडरसनच्या संभाव्य पुनरागमनाच्या शक्‍यतेमुळे बळ मिळाले आहे.

भारताविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन उपलब्ध होण्याची शक्‍यता वाढली आहे. खांद्याच्या दुखापतीमुळे अँडरसन ऑगस्टपासून मैदानावर उतरलेला नाही. यामुळे तंदुरुस्तीचे कारण पाहता भारताविरुद्धच्या मालिकेसाठीच्या संघातून त्याला वगळण्यात आले होते. पण अँडरसनच्या तंदुरुस्तीचा वेग अपेक्षेपेक्षा चांगला आहे. त्यामुळे राजकोटमध्ये 9 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या कसोटीपूर्वीच तो इंग्लंडच्या संघात दाखल होईल, असे सांगितले जात आहे. विशाखापट्टणम येथे 17 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटीमध्ये त्याचा अंतिम संघात समावेश होऊ शकेल.

आशिया खंडात खेळलेल्या 17 कसोटींमध्ये अँडरसनने 55 बळी घेतले आहेत. 2012 मध्ये इंग्लंडच्या संघाने कसोटी मालिकेत भारतीय संघाला पराभूत केले होते. 'अँडरसन हाच दोन्ही संघांमधील फरक होता' अशी प्रतिक्रिया भारताचा तत्कालीन कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने व्यक्त केली होती. त्या मालिकेत अँडरसनने 12 गडी बाद केले होते.

अर्थात, अँडरसनची तंदुरुस्ती तपासण्यासाठी भारतात एखादा क्‍लब पातळीवरील सामना खेळविण्याची संघ व्यवस्थापनाची कल्पना इंग्लंडच्या सुरक्षा व्यवस्थापकांनी फेटाळून लावली आहे. संघाची सुरक्षा धोक्‍यात येऊ नये म्हणून संपूर्ण दौऱ्यामध्ये सर्व संघ एकत्रच असावा, असा सुरक्षा व्यवस्थापकांचा आग्रह आहे, असे 'क्रिकइन्फो'च्या वृत्तात म्हटले आहे.

या वातावरणामध्ये फलंदाजांना अडचणीत कसे आणायचे, हे अँडरसनला ठाऊक आहे. आता संघातील इतर गोलंदाजांनाही त्याचे मार्गदर्शन मिळेल आणि हे जास्त महत्त्वाचे आहे. 2008-09 पासून स्टुअर्ट ब्रॉड आणि अँडरसन हेच संघाचे प्रमुख गोलंदाज आहेत. त्यांच्यामुळे संघाची सतत प्रगती होत आहे.
- ऍलिस्टर कूक, इंग्लंडचा कर्णधार

Web Title: James Anderson likely to play against India in second test