बुमराह, चहल कसोटी क्रिकेटसाठी तयार: गावसकर

गुरुवार, 9 नोव्हेंबर 2017

बुमराह आणि चहल हे दोन युवा क्रिकेटपटू कसोटी क्रिकेटसाठी सज्ज झाले आहेत. मर्यादित षटकांच्या सामन्याप्रमाणेच कसोटी क्रिकेटमध्येही ते उत्तम गोलंदाजी करतील. आयपीएलमधील अनुभव त्यांना गोलंदाजी करताना होत आहे. फलंदाजाला कोणत्या टप्प्यावर खेळविले पाहिजे, तसेच लाईन काय ठेवली पाहिजे हे त्यांना माहिती झाले आहे.

नवी दिल्ली - एकदिवसीय आणि ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये प्रभावशाली गोलंदाजी करणारे जसप्रीत बुमराह आणि यजुवेंद्र चहल कसोटी क्रिकेटसाठी तयार असल्याचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी म्हटले आहे.

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्याविरुद्ध झालेल्या एकदिवसीय आणि ट्वेंटी-20 मालिकेत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि चहल यांनी प्रभावी गोलंदाजीचे प्रदर्शन केले होते. यांच्या गोलंदाजीच्या जोरावर भारताने मालिका जिंकण्यात यश मिळविले होते. या दोघांच्या गोलंदाजीचे कौतुक माजी क्रिकेटपटूंकडून करण्यात येत आहे.

गावसकर म्हणाले, की बुमराह आणि चहल हे दोन युवा क्रिकेटपटू कसोटी क्रिकेटसाठी सज्ज झाले आहेत. मर्यादित षटकांच्या सामन्याप्रमाणेच कसोटी क्रिकेटमध्येही ते उत्तम गोलंदाजी करतील. आयपीएलमधील अनुभव त्यांना गोलंदाजी करताना होत आहे. फलंदाजाला कोणत्या टप्प्यावर खेळविले पाहिजे, तसेच लाईन काय ठेवली पाहिजे हे त्यांना माहिती झाले आहे. अखेरच्या षटकांमध्ये गोलंदाजी कशी टाकायची यांना चांगलेच माहिती आहे. कसोटी क्रिकेटमध्ये वापरण्यात येत असलेल्या लाल चेंडूसह त्यांनी सराव केला पाहिजे. दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड दौऱ्यांमध्ये या दोघांचाही भारताला प्रभावीपणे वापर करता येईल.