भारताचे वर्चस्व; 134 धावांची आघाडी

वृत्तसंस्था
सोमवार, 28 नोव्हेंबर 2016

धावफलक : 
इंग्लंड : पहिला डाव : सर्वबाद 283 
भारत : पहिला डाव : 138.2 षटकांत सर्वबाद 417 

मुरली विजय 12, पार्थिव पटेल 42, चेतेश्‍वर पुजारा 52, विराट कोहली 62, अजिंक्‍य रहाणे 0, करुण नायर 4, आर. आश्‍विन 72, रवींद्र जडेजा 90, जयंत यादव 55, उमेश यादव 12, महंमद शमी नाबाद 1 
अवांतर : 16 
गोलंदाजी : 
जेम्स अँडरसन 0-48, ख्रिस वोक्‍स 0-86, मोईन अली 0-33, आदिल रशीद 4-118, बेन स्टोक्‍स 5-73, गॅरेथ बॅटी 0-47.

मोहाली: तळातील फलंदाजांनी संयमाने आणि कौशल्याने फलंदाजी केल्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताने पहिल्या डावात 134 धावांची महत्त्वाची आघाडी घेतली. भारताचा पहिला डाव 417 धावांवर संपुष्टात आला. कारकिर्दीतील दुसरीच कसोटी खेळणाऱ्या जयंत यादवने अर्धशतक झळकावत इंग्लंडच्या जखमेवर मीठच चोळले. 

भारतीय फलंदाजांनी आज (सोमवार) कालच्या धावसंख्येत 146 धावांची भर घातली. विशेष म्हणजे, सातव्या किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांवरील तीन फलंदाजांनी एकाच डावात अर्धशतक झळकाविण्याची ही भारतासाठीची पहिलीच वेळ आहे. सातव्या क्रमांकावर खेळणारा आश्‍विन (72), रवींद्र जडेजा (90), जयंत यादव (55) यांनी अर्धशतके झळकाविली. 

काल दिवसाचा खेळ थांबला, तेव्हा भारताने 6 बाद 271 धावा केल्या होत्या. आश्‍विन-जडेजाने सुरवातीला इंग्लंडवर वर्चस्व गाजविले. खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली असताना आणि इंग्लंडचे गोलंदाजांची लय हरवलेली असताना आश्‍विन आणि जडेजा दोघांनाही शतक झळकाविण्याची उत्तम संधी होती. बेन स्टोक्‍सने आश्‍विनचा अडथळा दूर केला. त्यानंतर जयंत यादवने आत्मविश्‍वासाने जडेजाला चांगली साथ दिली. शतकाच्या उंबरठ्यावर असताना जडेजाने अचानक आक्रमक पवित्रा स्वीकारला. आदिल रशीदला षटकार खेचण्याच्या प्रयत्नात जडेजाने सीमारेषेजवळ ख्रिस वोक्‍सकडे झेल दिला. त्यानंतर जयंत आणि उमेश यादव यांनी आणखी उपयुक्त धावा केल्या. 

इंग्लंडकडून आदिल रशीद आणि बेन स्टोक्‍स या दोनच गोलंदाजांना विकेट्‌स मिळविण्यात यश आले. स्टोक्‍सने पाच, तर रशीदने चार गडी बाद केले. एक फलंदाज धावबाद झाला. 

Web Title: Jayant Yadav, Ravindra Jadeja puts India in driver's seat against England in Mohali test