बेन डकेट 'आऊट'; जोस बटलरला संधी

वृत्तसंस्था
मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016

बेन डकेट हा एक दर्जेदार फलंदाज आहे. पुढील सामन्यात तो असेल किंवा नसेलही; पण इंग्लंडसाठी येत्या काळात तो प्रमुख भूमिका बजावू शकेल, याविषयी शंका नाही. सरावामध्ये बेन डकेट इतरांपेक्षा जास्त घाम गाळत आहे. त्याला लवकरच पुन्हा सूर गवसेल.
- ट्रेव्हर बेलिस, इंग्लंडचे प्रशिक्षक

मोहाली : भारतीय खेळपट्ट्यांवर धावांसाठी झगडत असलेल्या बेन डकेटला मोहालीमधील तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यासाठी वगळले जाण्याची दाट शक्‍यता आहे. त्याच्या जागी यष्टिरक्षक - फलंदाज जोस बटलरची निवड होऊ शकते.

अर्थात, इंग्लंडच्या संघात जॉनी बेअरस्टॉ हा नियमित यष्टिरक्षक असल्याने बटलर फलंदाज म्हणूनच संघात येऊ शकेल. भारतीय फिरकी गोलंदाजांसमोर डकेट दोन्ही कसोटींमध्ये चाचपडत खेळत होता. दोन्ही सामन्यांत त्याला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. या मालिकेतील तीन डावांमध्ये डकेटने केवळ 18 धावा केल्या आहेत.
तीन सामन्यांच्या मालिकेमध्ये इंग्लंड 0-1 अशा पिछाडीवर आहे. त्यामुळे मालिकेतील पराभव टाळण्यासाठी इंग्लंडला मोहालीत विजय अत्यावश्‍यक आहे. त्यासाठी संघात आवश्‍यक ते बदल करण्यासाठी इंग्लंडकडे पुरेशी 'बेंच स्ट्रेंथ'ही नाही. इंग्लंडच्या संघात डकेटसाठी बदली खेळाडू म्हणून गॅरी बॅलन्स आणि जोस बटलर हे दोनच पर्याय आहेत. बांगलादेशमधील खराब कामगिरीमुळे बॅलन्सला संघातून वगळण्यात आले होते.

दुसरीकडे, जोस बटलरनेही कसोटी क्रिकेटमध्ये फारशी प्रभावी कामगिरी केलेली नाही. गेल्या 12 डावांमधील त्याची सर्वोच्च धावसंख्या 30 होती. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील त्याची सरासरी 32.07 आहे. त्याला कसोटी संघातून वर्षभरापूर्वीच वगळण्यात आले होते. त्यानंतर तो एकच प्रथम श्रेणी सामना खेळला आहे. बांगलादेशमध्ये खेळलेल्या या सराव सामन्यात बटलरने केवळ चारच धावा केल्या होत्या.

इंग्लंडचे प्रशिक्षक ट्रेव्हर बेलिस म्हणाले, "एकदिवसीय क्रिकेटमध्ये बटलरची कामगिरी चांगली आहे. त्याच पद्धतीने तो कसोटीमध्येही खेळू शकला, तर संघासाठीही ते चांगले असेल. एकदिवसीय क्रिकेटमध्ये बटलर हा सध्याच्या सर्वांत धडाकेबाज फलंदाजांपैकी एक आहे. कसोटीमध्येही अशीच फलंदाजी करून तो प्रतिस्पर्ध्यांवर दडपण आणू शकतो.''

बेन डकेट हा एक दर्जेदार फलंदाज आहे. पुढील सामन्यात तो असेल किंवा नसेलही; पण इंग्लंडसाठी येत्या काळात तो प्रमुख भूमिका बजावू शकेल, याविषयी शंका नाही. सरावामध्ये बेन डकेट इतरांपेक्षा जास्त घाम गाळत आहे. त्याला लवकरच पुन्हा सूर गवसेल.
- ट्रेव्हर बेलिस, इंग्लंडचे प्रशिक्षक

Web Title: Jos Buttler set to replace Ben Duckett in Mohali