माझ्यासाठी हे शतक सर्वकाही : लोकेश राहुल

वृत्तसंस्था
Thursday, 5 July 2018

''मी आंतरराष्ट्रीय शतक झळकावून आता दोन वर्षे उलटून गेली होती, त्यामुळे हे शतक प्रचंड समाधान देणारे आहे.''

मॅंचेस्टर : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शतकाचा दुष्काळ लोकेश राहुलच्या मनात खूप दिवसांपासून घर करुन होता. कदाचित त्यामुळेच पहिल्या ट्वेंटी20 सामन्यात झळकावलेले शतक हे त्याच्यासाठी सर्वकाही असल्याचे राहुलने एका मुलाखतीत म्हटले आहे. राहुलच्या 54 चेंडूमधील 101 धावांच्या जोरावर भारताने इंग्लंडचा आठ विकेट राखून पराभव केला. 
दिनेश कार्तिकने भारतीय नियामक मंडळाच्या bcci.tv साठी पहिल्या सामन्यानंतर मैदानावरच राहुलसोबत संवाद साधला. त्यावेळी राहुल म्हणाला, ''मी आंतरराष्ट्रीय शतक झळकावून आता दोन वर्षे उलटून गेली होती, त्यामुळे हे शतक प्रचंड समाधान देणारे आहे.'' राहुलने 2016 साली चेन्नईमध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात शेवटचे शतक केले होते. 

दिनेश कार्तिकने मर्यादित षटकांच्या सामन्यात संघातील त्याच्या स्थानाबद्दल विचारले असता तो म्हणाला, ''मागील एक वर्षाचा काळ हा फार खडतर होता. मी कसोटी क्रिकेट आणि आयपीएलमध्ये अर्धशतके केली परंतू मला एक दिड वर्षे दुखापतींना ग्रासले होते. भारतीय संघात माझी जागा निश्चित नव्हती. मी यापेक्षा जिद्दीने आणि उत्कंठेने कशाचा पाठलाग केला नव्हता. त्यामुळे आजचे शतक माझ्यासाठी सर्व काही आहे '' 

ट्वेंटी20 क्रिकेटमध्ये चारपेक्षी खाली फलंदाजीला येऊन शतक करणारा राहुल आंतरराष्ट्रीय ट्वेंटी20 क्रिकेटमधील पहिला फलंदाज आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: K L Rahul says this cetury means the world to me