नायर ट्रिपल पॉवर!  भारताच्या सर्वोच्च कसोटी धावा

वृत्तसंस्था
सोमवार, 19 डिसेंबर 2016

भारताची आजची धावसंख्या आता क्रिकेटच्या जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावर झेपावली आहे. भारतापुढे श्रीलंका (952), इंग्लंड (903), इंग्लंड (849), वेस्ट इंडिज (790), पाकिस्तान (765), ऑस्ट्रेलिया (758) आणि श्रीलंका (760) यांची सर्वोच्च धावसंख्या आहे.

चेन्नई - भारतीय कसोटी क्रिकेटच्या 84 वर्षांच्या इतिहासात आजचा (सोमवार) दिवस अभूतपूर्व ठरला. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील पाचव्या क्रिकेट कसोटीच्या चौथ्या दिवशी भारताने सात बाद तब्बल 759 धावा रचत यापूर्वीचा 9 बाद 726 धावांचा उच्चांक मागे टाकला. 

भारताची ही धावसंख्या आता क्रिकेटच्या जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावर झेपावली आहे. भारतापुढे श्रीलंका (952), इंग्लंड (903), इंग्लंड (849), वेस्ट इंडीज (790), पाकिस्तान (765), ऑस्ट्रेलिया (758) आणि श्रीलंका (760) यांची सर्वोच्च धावसंख्या आहे. यापूर्वी भारताने 2 डिसेंबर 2009 रोजी मुंबईमध्ये श्रीलंकेविरुद्ध एका डावात 9 बाद 726 धावा केल्या होत्या. 

करुण नायर या विक्रमाचा कर्ताकरविता ठरला. रविवारी 71 धावांवर नाबाद राहिलेल्या नायरने दिवसभरात तब्बल 229 धावा करीत त्रिशतक साजरे केले. 25 वर्षे वयाच्या नायरची ही अवघी तिसरी कसोटी. इंग्लंडविरुद्ध मोहालीमध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱया नायरने अवघ्या चार धावा केल्या होत्या. मुंबईत दुसरी कसोटी खेळताना नायर अवघ्या तेरा धावांवर बाद झाला. तिसऱया कसोटीमध्ये त्रिशतक झळकावून नायरने अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. 

त्याच्यासोबत खेळत असलेला रविंद्र जडेजा 51 धावांवर झेलबाद झाला. त्यावेळी नायर 378 चेंडूंमध्ये 299 धावांवर खेळत होता. त्रिशतकाच्या ऐन उंबरठ्यावर असताना जडेजाने त्याची साथ सोडली. त्यानंतर चौकार ठोकत नायरने त्रिशतक गाठले आणि कर्णधार विराट कोहलीने भारताचा डाव घोषित केला. 

इंग्लंडवर भारताने आता 282 धावांची आघाडी घेतली आहे. पहिल्या डावात 477 धावा करणाऱया इंग्लंडला आता विजयासाठी नव्हे; तर डावाने पराभव टाळण्यासाठी धडपडावे लागणार आहे. चेन्नईतील कसोटीचा अद्याप शेवटचा दिवस मंगळवारी बाकी आहे. भारताने पाच कसोटी सामन्यांची मालिका आधीच 3-0 अशा विजयाने खिशात टाकली आहे. चेन्नईत विजय मिळाल्यास व्हाईटवॉशची भारताला संधी आहे. 

नायरने केवळ 381 चेंडूंमध्ये तब्बल 79.52 च्या स्ट्राईक रेटने 32 चौकार आणि चार षटकारांसह त्रिशतक साजरे केले. 303 धावांवर नाबाद राहणाऱया नायरची कसोटी क्रिकेटमधील सरासरी त्रिशतकामुळे तब्बल 160 वर पोहोचली. 

भारताने 1932 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. 84 वर्षांच्या इतिहासात भारताने 2004 मध्ये पहिल्यांदाच सातशेहून अधिक धावा उभा केल्या. त्याही ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी येथील कसोटीमध्ये. तेव्हा भारताने पहिल्या डावात 7 बाद 705 धावांवर डाव घोषित केला होता. 

त्यानंतर 2010 मध्ये श्रीलंकेविरुद्ध कोलंबो कसोटीमध्ये दुसऱया डावात भारताने 707 धावा करून सर्वाधिक धावांचा स्वतःचाच उच्चांक मागे टाकला. 2009 मध्ये श्रीलंकेविरुद्धच मुंबई कसोटीमध्ये दुसऱया डावात केलेल्या नऊ बाद 726 धावा भारताची आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या होती. 

Web Title: Karun Nair hits triple century, India ranks at number seventh in test cricket score