चौथ्या कसोटीत इंग्लंडची भक्कम सुरवात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 डिसेंबर 2016

मुंबई: कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या किटन जेनिंग्जच्या दमदार अर्धशतकामुळे भारताविरुद्धच्या चौथ्या क्रिकेट कसोटी सामन्यातील पहिल्या दिवशी उपाहारापर्यंत इंग्लंडने 1 बाद 117 धावा केल्या. इंग्लंडचा कर्णधार ऍलिस्टर कूकने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली.

मुंबई: कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या किटन जेनिंग्जच्या दमदार अर्धशतकामुळे भारताविरुद्धच्या चौथ्या क्रिकेट कसोटी सामन्यातील पहिल्या दिवशी उपाहारापर्यंत इंग्लंडने 1 बाद 117 धावा केल्या. इंग्लंडचा कर्णधार ऍलिस्टर कूकने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली.

या सामन्यासाठी दुखापतीमुळे भारतीय संघात दोन बदल झाले आहेत. अजिंक्‍य रहाणे आणि महंमद शमी यांना बाहेर बसावे लागले. त्यांच्या जागी सलामीवीर लोकेश राहुल आणि वेगवान गोलंदाज भुवनेश्‍वर कुमार यांना संधी मिळाली. यष्टिरक्षक वृद्धिमान साहा अजूनही पूर्ण तंदुरुस्त झाला नसल्याने पार्थिव पटेलचे संघातील स्थान कायम राहिले. इंग्लंडनेही संघात दोन बदल केले. हसीब हमीद आणि स्टुअर्ट ब्रॉड जखमी झाल्यामुळे जेनिंग्ज आणि जेक बॉल यांना संघात स्थान मिळाले.

उमेश यादव आणि भुवनेश्‍वर कुमारच्या सुरवातीच्या काही षटकांमध्ये कूक आणि जेनिंग्ज दोघेही अडखळत होते. विशेषत:, उमेश यादवचे उसळते चेंडू खेळताना जेनिंग्ज अडचणीत आला होता. पण नव्या चेंडूची लकाकी गेल्यानंतर या दोघांनी खेळपट्टीवर चांगला जम बसविला. पहिलीच कसोटी खेळत असूनही अनुभवी कूकपेक्षा जेनिंग्ज फिरकी गोलंदाजी अधिक आक्रमक आणि आत्मविश्‍वासाने खेळत होता. पहिल्याच डावात अर्धशतकही झळकाविले. दुसरीकडे, ऍलिस्टर कूकनेही आक्रमक पवित्रा स्वीकारला. रवींद्र जडेजाला पुढे सरसावून षटकार खेचण्याच्या प्रयत्नात कूक बाद झाला. त्यानंतर जेनिंग्ज आणि ज्यो रूट यांनी अधिक पडझड होऊ दिली नाही.

भारतीय संघ :
मुरली विजय, लोकेश राहुल, चेतेश्‍वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), करुण नायर, आर. आश्‍विन, पार्थिव पटेल (यष्टिरक्षक), रवींद्र जडेजा, जयंत यादव, भुवनेश्‍वर कुमार, उमेश यादव.

इंग्लंडचा संघ :
ऍलिस्टर कूक (कर्णधार), किटन जेनिंग्ज, ज्यो रूट, मोईन अली, बेन स्टोक्‍स, जॉनी बेअरस्टॉ (यष्टिरक्षक), जोस बटलर, ख्रिस वोक्‍स, आदिल रशीद, जेम्स अँडरसन, जेक बॉल.

धावफलक :
इंग्लंड : पहिला डाव : 31 षटकांत 1 बाद 117 (उपाहारापर्यंत)

ऍलिस्टर कूक 46, किटन जेनिंग्ज खेळत आहे 65, ज्यो रूट खेळत आहे 5
रवींद्र जडेजा 1-9

Web Title: Keaton Jennings' debut fifty leads England's charge in Fourth Test against India