राहुलचे इंग्लंडला चोख प्रत्युत्तर; भारत 4 बाद 391

वृत्तसंस्था
रविवार, 18 डिसेंबर 2016

धावफलक -
इंग्लंड, पहिला डाव ः 477.
भारत, पहिला डाव ः केएल राहुल झेल. बटलर गो. रशीद 199 (311 चेंडूत 16 चौकार आणि 3 षटकार), पार्थिव पटेल झे. बटलर गो. अली 71 (112 चेंडूत 7 चौकार), चेतेश्वर पुजारा झे. कूक गो. स्टोक्‍स 16 (29 चेंडूत 3 चौकार), विराट कोहली झे. जेनिंग्स गो. ब्रॉड 15 (29 चेंडूत 1 चौकार), करुण नायर खेळत आहे 71 (136 चेंडूत 6 चौकार), मुरली विजय खेळत आहे 17 (31 चेंडूत 3 चौकार), अवांतर ः 2 (लेग बाईज 2), एकूण ः 108 षटकात 4 बाद 391.
बाद क्रम ः 1-152, 2-181, 3-211, 4-372.
गोलंदाजी ः स्टुअर्ट ब्रॉड 18-4-46-1, जेक बॉल 15-1-50-0, मोईन अली 24-1-96-1, बेन स्टोक्‍स 9-1-37-1, आदिल रशीद 17-0-76-1, लियाम डॉसन 23-3-72-0, जो रुट 2-0-12-0.

चेन्नई - मायदेशात एकदाही अर्धशतक न केलेला सलामीवीर आणि त्याच्या साथीला बदली सलामीवीर ही जोडी कितपत टिकणार या टीकाकारांच्या प्रश्नाला दोघांनीही बॅटने उत्तर दिले. मायदेशातील कसोटीत प्रथमच पस्तीशी पार करणाऱ्या राहुलने इंग्लंड गोलंदाजांना चांगलेच थकवले. त्याचे द्विशतक एका धावेने हुकले, पण त्याच्या दोन दीडशतकी भागीदारीमुळे भारताच्या आघाडीचा पाया नक्कीच रचला आहे.

मुंबई कसोटी गमावल्यावर अलीस्टर कूकने पहिल्या डावात साडेचारशे धावा झाल्या असत्या, तर भारतावर दडपण आले असते, असे मत व्यक्त केले होते. राहुलने त्याच्या बॅटनेच जणू त्याला उत्तर दिले. पावणेपाचशे धावा, तसेच पहिल्या सत्रातील विकेटचे दडपण याद्वारे इंग्लंड वर्चस्व घेण्याची आशा बाळगून होते, पण इंग्लंड या कसोटीत पहिल्या दिवशी उपाहारापूर्वी 2 बाद 68, दुसऱ्या दिवशी 3 बाद 68 अशी कामगिरी करीत असताना भारतीयांनी 1 बाद 113 अशी कामगिरी करीत दोन संघातील फरक अधोरेखित केला. हे घडवणाऱ्या राहुलने आता या कसोटीत इंग्लंडची हार नाहीतर अनिर्णीत हेच दोन पर्याय घडण्याचीच शक्‍यता जास्त असल्याचेच जणू सांगितले. त्याने पार्थिव पटेलसह 152 आणि करुण नायरसह 161 भागीदारी करीत भारतास वर्चस्व दिले.
शंभर षटके खेळल्यानंतर राहुलची एकाग्रता भंग पावली आणि दुर्दैवाने तो द्विशतकापासून एक धाव दूर असताना बाद झाला. त्यानंतरच इंग्लंडने पहिला रिव्ह्यू घेतला. पहिल्या आणि तिसऱ्या कसोटीस दुखापतीने मुकलेल्या तर दुसऱ्या आणि चौथ्या कसोटीत खराब फटक्‍यावर राहुल बाद झाला होता. तो या चूकीतून शिकला. त्याने ऑफ स्टम्पबाहेरील चेंडूचा मोह टाळला. त्याचबरोबर फिरकीला क्रीझबाहेर उभे राहण्याऐवजी एक पाय क्रीझमध्ये ठेवून उभा राहिला.

इंग्लंडने दुसऱ्या दिवशी राखून ठेवलेल्या लियाम डॉसनला तिसऱ्या षटकात षटकार खेचत राहुलने इंग्लंडला इशारा दिला. छान पदलालीत्य असलेल्या राहुलने रिव्हर्स स्वीपचाही हुशारीने वापर केला. त्याच्या या आक्रमकतेमुळे इंग्लंड फिरकी गोलंदाजांना वर्चस्व लाभले नाही. पार्थिव पटेल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली हे 59 धावात परतल्यानंतरही राहुल डगमगला नाही. त्याने कर्नाटक संघातील सहकारी करुण नायरच्या साथीत भारत वर्चस्व गमावणार नाही, याची काळजी घेतली. त्याने आपल्या भात्यातील सर्व फटके वापरत इंग्लंड गोलंदाजांना क्षेत्ररचना कशी करावी हे प्रश्न निर्माण केले. नवा चेंडूही भारताच्या पथ्यावर पडेल याकडे त्याने लक्ष दिले. राहुलच्याच शब्दात सांगायचे तर तो अत्यंत खराब फटक्‍यावर बाद झाला. एकमात्र खरे त्याने त्यापूर्वी भारताची बाजू चांगलीच भक्कम केली आहे.

Web Title: KL Rahul makes century against England in Chennai test