कोहलीसोबत खेळण्याचा फायदा झाला - जाधव

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 जानेवारी 2017

या एका खेळीने आयुष्य बदलले की नाही, हे माहीत नाही. पण, मी फोन सायलेंटवर ठेवला आहे. जे झाले त्यावर बोलण्यापेक्षा मला वर्तमानात जगायला आवडते.

-केदार जाधव

पुणे - इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात पराभवाच्या गर्तेत असणाऱ्या भारतीय संघाला त्या गर्तेतून बाहेर काढत विजय मिळवून देणाऱ्या पुण्याच्या केदार जाधवने कर्णधार विराट कोहलीच्या साथीत फलंदाजी केल्याचा आपल्या फायदा झाल्याचे मान्य केले. 

कोहलीच्या साथीत द्विशतकी भागीदारी करताना शतकी खेळी करणारा केदार या एका स्वप्नवत खेळीने क्रिकेट चाहत्यांचा हिरो ठरला. तो म्हणाला, ‘‘जेव्हा तुम्ही विराटच्या साथीत खेळत असता, तेव्हा त्याचा फायदा तुम्हाला नेहमीच होत असतो. कारण, गोलंदाजांचे सगळे लक्ष्य विराट असते. विराटही त्यांना डिवचत असतो. त्यामुळे गोलंदाजांचा कस लागत असतो. अशा वेळी गोलंदाजांचे दुसऱ्या फलंदाजांच्या क्षमतेकडे दुर्लक्ष होत असते. याचा फायदा मी उठवला.’’

भारताची अवस्था ४ बाद ६३ अशी नाजूक असताना केदार खेळपट्टीवर आला. त्यानंतर त्याने ७६ चेंडूंत शतकी खेळी करताना १२ चौकार आणि चार षटकार ठोकले. चेंडू त्या दिवशी कोहलीबरोबर केदारच्याही बॅटचा जणू गुलाम झाला होता. त्याने मारलेले काही फटके अविश्‍वसनीय होते. या विषयी कोहली म्हणाला, ‘‘लहानपणी टेनिसचेंडूवर खूप खेळायचो. गल्ली क्रिकेट तर विचारूच नका. त्यामुळे समोरच्या बाजूने उंचावून फटके मारण्याची सवय झाली होती. तीच सवय मला या वेळी कामी आली. धावगतीचे आव्हान वाढत होते. त्यामुळे फटकेबाजीशिवाय पर्याय नव्हता. लय गवसल्यावर मग मी मागे वळून बघितले नाही.’’

खेळपट्टीवर येताना भारताची नाजूक परिस्थिती बघता त्या वेळी असलेल्या मानसिकतेविषयी केदार म्हणाला, ‘‘जेव्हा तुम्ही देशासाठी खेळत असता तेव्हा तुम्हाला शंभर टक्‍क्‍यांपेक्षा अधिक योगदान द्यायचे असते. देशासाठी खेळताना प्रत्येक सामन्यात माझी तीच मानसिकता असते. येथील खेळपट्टी ओळखीची होती. नैसर्गिक खेळ करायचा, ही खूणगाठ मनाशी पक्की होती.’’

दोन वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून परत आल्यावर माझा हात फ्रॅक्‍चर असल्याचे निष्पन्न झाले. पण, वेदना विसरून ऑस्ट्रेलिया दौऱ्यात आपण चमकदार कामगिरी करू शकलो, असा विचार मनात येऊन गेला आणि आपला आत्मविश्‍वास उंचावला, असेही त्याने या वेळी सांगितले. 

Web Title: Kohli along with the benefit of playing - Jadhav