World Cup 2019 : भारताचे अफगाणिस्तान पुढे 225 धावांचे माफक आव्हान

वृत्तसंस्था
Saturday, 22 June 2019

दुबळ्या समजल्या जाणाऱ्या अफगाणिस्तान संघाने विश्व करंडकाच्या विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असणाऱ्या भारतीय संघाला अफगाणी फिरकीने चांगलीच वेसण घातली.

वर्ल्ड कप 2019 : साऊदम्प्टन : दुबळ्या समजल्या जाणाऱ्या अफगाणिस्तान संघाने विश्व करंडकाच्या विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असणाऱ्या भारतीय संघाला अफगाणी फिरकीने चांगलीच वेसण घातली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाने अफगाणिस्तानसमोर 50 षटकांत 8 गड्यांच्या मोबदल्यात 225 धावांचे माफक आव्हान उभारले.

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये यंदाच्या विश्व करंडक स्पर्धेतील पहिला सामना हॅम्पशायर बाऊल येथे खेळला जात आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय भारतीय कर्णधार विराट कोहलीने घेतला, मात्र भारताच्या डावाची सुरूवात खराब झाली. सलामीवीर रोहित शर्माला मुजीब उर रहमानने त्रिफळाचीत केले. यंदाच्या मोसमात आपल्या फलंदाजीने प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांची भंबेरी उडवणारा रोहित अवघी एक धाव काढून माघारी परतला. त्यापाठोपाठ के. एल. राहुल (53 चेंडूत 30 धावा) आणि विजय शंकर (41 चेंडूत 29 धावा) हे ठराविक अंतराने बाद झाले. 

कर्णधार विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनी यांनी ही पडझड रोखण्याचा प्रयत्न केला. विराटने आपले 52 वे अर्धशतक पूर्ण केले मात्र, अर्धशतकानंतर त्याला जास्त वेळ खेळपट्टीवर थांबता आले नाही. मोहम्मद नबीच्या गोलंदाजीवर रेहमत शाहकडे झेल देऊन तो झेलबाद झाला. त्याने 63 चेंडूत 67 धावांची खेळी केली. त्यानंतर भारताच्या धावसंख्येला ब्रेक लागला. 30.3 षटकांत 4 बाद 135 अशी दयनीय अवस्था झाल्याने आणि आघाडीचे फलंदाज स्वस्तात तंबूत परतल्याने महेंद्रसिंह धोनी आणि केदार जाधव यांनी संथ खेळण्याचा निर्णय घेतला. 

एकेरी-दुहेरी धावा फलकावर लागत असताना 45 व्या षटकात राशिद खानला पुढे होऊन खेळण्याच्या नादात धोनी यष्टिचित झाला. त्यानंतर आलेला हार्दिक पंड्याही लगेच माघारी परतला. एकीकडे पडझड सुरू असताना दुसऱ्या बाजूने किल्ला लढविणारा केदार जाधव 68 चेंडूत 52 धावांची अर्धशतकी खेळी करून बाद झाला. अफगाणी फिरकीपुढे निभाव न लागलेल्या  भारतीय संघाने 50 षटकांत 8 जणांच्या मोबदल्यात 224 धावा केल्या. आणि अफगाणिस्तान पुढे 225 धावांचे माफक आव्हान उभे केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kohli Jadhav fifties help India limp to 224 runs