कोहलीची ‘खेलरत्न’, तर द्रविडची ‘द्रोणाचार्य’साठी शिफारस

वृत्तसंस्था
Friday, 27 April 2018

नवी दिल्ली - केंद्र सरकारकडून देण्यात येणाऱ्या विविध क्रीडा पुरस्कारांसाठी खेळाडूंची शिफारस करण्याची स्पर्धा देशांमधील बहुविध क्रीडा संघटनांमध्ये दिसू लागली आहे. क्रिकेटसह राष्ट्रकुल तसेच जागतिक स्पर्धेत पदक विजेत्या खेळाडूंची नावे यात आघाडीवर आहेत.

नवी दिल्ली - केंद्र सरकारकडून देण्यात येणाऱ्या विविध क्रीडा पुरस्कारांसाठी खेळाडूंची शिफारस करण्याची स्पर्धा देशांमधील बहुविध क्रीडा संघटनांमध्ये दिसू लागली आहे. क्रिकेटसह राष्ट्रकुल तसेच जागतिक स्पर्धेत पदक विजेत्या खेळाडूंची नावे यात आघाडीवर आहेत.

क्रीडा क्षेत्रातील सर्वोत्तम ‘खेलरत्न’ पुरस्कारासाठी ‘बीसीसीआय’ने भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या नावाची शिफारस केली आहे. त्याचबरोबर त्यांनी सुनील गावसकर आणि राहुल द्रविड यांची नावे अनुक्रमे ‘ध्यानचंद’ जीवनगौरव आणि ‘द्रोणाचार्य’ पुरस्कारासाठी पाठवली आहेत. क्रिकेटपटू शिखर धवन, स्मृती मानधना यांची यापूर्वीच त्यांनी ‘अर्जुन’साठी शिफारस केली आहे. 

वेटलिफ्टिंग संघटनेने राष्ट्रकुल सुवर्णविजेत्या मीराबाई चानू हिचे नाव ‘अर्जुन’साठी पाठवले असले तरी, गेल्यावर्षी जागतिक स्पर्धेतील सुवर्ण कामगिरीमुळे ती ‘खेलरत्न’साठीदेखील शर्यतीत असल्याचे मानले जात आहे. विशेष म्हणजे २०१४ मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेतच सुवर्णपदक मिळविल्यावर मीराबाईची ‘अर्जुन’साठी शिफारस करण्यात आली होती. त्या वेळी पुरस्कार समितीने तिच्या नावाचा विचार केला नव्हता. त्यानंतर गेल्याचवर्षी मीराबाईला ‘पद्मश्री’ने सन्मानित करण्यात आले आहे. त्याचवेळी या वेळी संजिताचे ‘अर्जुन’साठी पुन्हा नाव पाठविण्यात आले आहे. गेल्यावर्षी पुरस्कार डावलल्यामुळे तिने केंद्रीय क्रीडा मंत्रालयाला न्यायालयात खेचले होते. 

यांची झाली शिफारस
अर्जुन - शिखर धवन, स्मृती मानधना, शाहजार रिझवी, मीराबाई चानू, संजिता चानू, पूजा घाटकर, श्रेयांसी सिंग, अंकुर मित्तल, वेंकट राहुल रगाला. रितू फोगट, ज्योती, पवन कुमार, विनोद ओमप्रकाश, सुमीत, मनिका बात्रा, युकी भांब्री, रोहन बोपन्ना, गौरव भिदुरी, सोनिया लाथर 

द्रोणाचार्य - राहुल द्रविड, विजय शर्मा, शिव सिंग, भास्कर भट्ट, संध्या गुरुंग


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kohli Khel Ratna Dravid Dronacharya recommendation