esakal | कोहलीला कुलदीप आणि चहलला खेळवण्याचा मोह आवरेना
sakal

बोलून बातमी शोधा

Kohli might be tempted to play Kuldeep, Chahal in Tests

''कसोटी सामन्यांसाठी मला संधी मिळण्याची मला अपेक्षा आहे, पुढील काही दिवसातच कसोटी मालिकेचा संघ घोषित करण्यात येईल त्यानंतर काय होईल ते पाहू.''

कोहलीला कुलदीप आणि चहलला खेळवण्याचा मोह आवरेना

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नॉटिंगहॅम : मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करणारा भारताचा डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवला आता कसोटी क्रिकेटचे वेध लागले आहेत. पहिल्या एकदिवसीय सामन्यानंतर बोलताना तो म्हणाला,''कसोटी सामन्यांसाठी मला संधी मिळण्याची मला अपेक्षा आहे, पुढील काही दिवसातच कसोटी मालिकेचा संघ घोषित करण्यात येईल त्यानंतर काय होईल ते पाहू.'' भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका एक ऑगस्टला सुरु होणार आहे.  

भारताचा कर्णधार विराट कोहलीलाही भारतीय गोलंदाजीचे 'हुकमी एक्के' असलेल्या कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल यांना आता कसोटी क्रिकेटमध्ये खेळवायचे आहे. कुलदीपने 2017 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. मात्र चहलला अद्याप कसोटी क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी मिळालेली नाही. 

''कसोटी मालिकेसाठी संघ निवडताना काही आश्चर्यकारक निर्णय होण्याची शक्यता आहे. कुलदीप आणि चहल उत्तम गोलंदाजी करत आहेत. इंग्लंडच्या फलंदाजांना यांना खेळणे अवघड होत आहे आणि यामुळेच या दोघांना कसोटी मालिकेत खेळवण्याचा मोह मला होत आहे.'' असे पहिल्या एकदिवसीय सामन्यानंतर कोहलीने स्पष्ट केले. मात्र पुढील सामना जिंकून मालिका खिशात घालण्याचा संघाचा प्रयत्न असल्याचे त्याने सांगितले. इंग्लंडमधील वातावरण छान असून हा फार मोठा दौरा आहे आणि पुढे येणाऱ्या आव्हानांसाठी संघ सज्ज आहे असेही त्याने सांगितले. 

अश्विन आणि जडेजा यांच्याऐवजी संघात स्थान दिल्यापासून कुलदीप आणि चहलने पदोपदी स्वत:ला सिद्ध केले आहे. त्यामुळेच आता त्यांना कसोटी मालिकेत संघात स्थान मिळाल्यास नवल वाटायला नको. 
 

loading image