क्रेग ब्राथवेटच्या शतकामुळे विंडीजला आघाडी 

वृत्तसंस्था
मंगळवार, 1 नोव्हेंबर 2016

शारजा : कसोटी क्रिकेटमध्ये सातत्याने चाचपडणाऱ्या वेस्ट इंडीजला 23 वर्षीय क्रेग ब्राथवेटच्या संयमी फलंदाजीने दिलासा दिला. पाकिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ब्राथवेटने झळकाविलेल्या नाबाद शतकाच्या जोरावर वेस्ट इंडीजने पाकिस्तानवर पहिल्या डावात 56 धावांची आघाडी घेतली. पाकिस्तानच्या वहाब रियाझने पाच गडी बाद केले. 

प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचा पहिला डाव 281 धावांत आटोपला होता. त्यानंतर विंडीजची सुरवातही खराब झाली. पहिल्या 15 षटकांतच विंडीजने लिऑन जॉन्सन, डॅरेन ब्राव्हो आणि मरलॉन सॅम्युअल्स हे तीन प्रमुख फलंदाज गमावले होते. सलामीला आलेल्या ब्राथवेटने एक बाजू लावून धरली होती. त्याने जर्माईन ब्लॅकवूड, रॉस्टन चेस आणि यष्टिरक्षक शेन डॉवरिच यांच्याबरोबर महत्त्वाच्या भागीदारी केल्या. 

तळातील फलंदाजांनी ब्राथवेटला चांगली साथ दिल्यामुळे विंडीजने पाकिस्तानची धावसंख्या ओलांडली. देवेंद्र बिशूबरोबरची आठव्या विकेटसाठीची 60 धावांची भागीदारी संपल्यानंतर विंडीजचा डाव फार काळ चालला नाही. सलामीला येऊन नाबाद राहण्याची कामगिरी करणारा ब्राथवेट हा वेस्ट इंडीजचा पाचवा फलंदाज ठरला. यापूर्वी फ्रॅंक वॉरेल, कॉनर्ड हंट, डेस्मंड हेन्स आणि ख्रिस गेल यांनी ही कामगिरी केली आहे. हे ब्राथवेटचे कसोटीतील पाचवे शतक होते. ब्राथवेट 142 धावांवर नाबाद राहिला. या खेळीत त्याने 11 चौकार मारले. 

पाकिस्तानकडून महंमद आमीर आणि वहाब रियाझ या वेगवान गोलंदाजांनी मिळून आठ गडी बाद केले. यासीर शहा आणि झुल्फिकार बाबर यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. 

संक्षिप्त धावफलक: 
पाकिस्तान : पहिला डाव : 90.5 षटकांत सर्वबाद 281 
सामी अस्लम 74, युनूस खान 51, मिस्बा उल हक 53, सर्फराज अहमद 51 
देवेंद्र बिशू 4-77, शॅनॉन गॅब्रिएल 3-67, अल्झारी जोसेफ 2-57 
वेस्ट इंडीज : पहिला डाव : 115.4 षटकांत सर्वबाद 337 
क्रेग ब्राथवेट नाबाद 142, रॉस्टन चेस 50, शेन डॉवरिच 47 
वहाब रियाझ 5-88, महंमद आमीर 3-71

Web Title: Kraig Brathwaite century gives West Indies lead against Pakistan