कुलदीप यादवचा इंग्लंडमध्ये विश्वविक्रम

वृत्तसंस्था
Friday, 13 July 2018

ट्रेंट ब्रीजच्या मैदानावर इंग्लंडने यापूर्वी दोनवेळा सर्वाधिक धावसंख्या उभारली आहे. त्याच मैदानावर सहा फलंदाज बाद करणारा कुलदीप हा पहिला डावखुरा फिरकी गोलंदाज ठरला आहे. तसेच कुलदीपची ही खेळी एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळी आहे.

नॉटिंगहॅम : कुलदीप यादवने ट्वेंटी20 मालिकेसारखीच धडाकेबाज गोलंदाजी करण्याचे सत्र पहिल्या एकदिवसीय सामन्यातही सुरु ठेवले. गुरुवारी (ता.12) इंग्लंडविरुद्ध झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात कुलदीपने 10 षटकांत 25 धावा देत इंग्लंडच्या सहा फलंदाजांना माघारी धाडले. या सामन्यात भारताच्या बाकीच्या गोलंदाजांनी षटकामागे पाच धावा दिल्या तर कुलदीपने फक्त 2.50 धावा दिल्या.

ट्रेंट ब्रीजच्या मैदानावर इंग्लंडने यापूर्वी दोनवेळा सर्वाधिक धावसंख्या उभारली आहे. त्याच मैदानावर सहा फलंदाज बाद करणारा कुलदीप हा पहिला डावखुरा फिरकी गोलंदाज ठरला आहे. तसेच कुलदीपची ही खेळी एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळी आहे. यापूर्वी डावखुऱ्या फिरकी गोलंदाजांमधील सर्वोत्तम कामगिरी ऑस्ट्रेलियाच्या ब्रॅड हॉजच्या नावावर होती. त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध 32 धावा देत पाच फलंदाजांना बाद केले होते. 

कुलदीपची ही खेळी भारतीय गोलंदाजांमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. यापूर्वी 2003मध्ये आशिष नेहराने 23 धावा देत इंग्लंडचे सहा फलंदाज बाद केले होते, 1993मध्ये अनिल कुंबळेने वेस्ट इंडिजविरुद्ध 12 धावा देत सहा गडी बाद केले होते तर 2014मध्ये स्टुअर्ट बिन्नीने फक्त चार धावा देत बांगलादेशच्या सहा फलंदाजांना बाद केले होते. 

इंग्लंडविरुद्ध त्यांच्या मायदेशात खेळताना सहा फलंदाज बाद करणारा कुलदीप यादव हा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे.

  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kuldeep yadav creates new record in England