गुरूने मार खायला शिकवले आहे : कुलदीप यादव

सुनंदन लेले
Wednesday, 4 July 2018

"जोस बटलर कितीही चांगल्या लयीत असला तरी तो मला धोका घेऊन मोठे फटके मारणार नाही हे मला वाटले होते. म्हणून त्याला एकेरी धाव देऊन दुसऱ्या फलंदाजाला गोलंदाजी करायला मी भाग पाडले कारण त्यांनी मला कधी तोंड दिले नव्हते. त्यातून माझे गुगली एकदम टप्प्यावर पडले. मॉर्गन, ज्यो रुट आणि बेअरस्टोची विकेट एकाच षटकात मिळणे ही कमाल होती''

 कार्डीफ : फलंदाजाकरता शतक केल्यावर जो मान मिळतो तोच मान गोलंदाजाला एकाच डावात 5 बळी मिळवल्यावर मिळतो. कसोटी सामन्यात 5 बळी काढणे मानाचे समजले जाते तसेच अवघड. एक दिवसीय सामन्यात गोलंदाजाला 10 षटकेच टाकायला मिळतात त्यात जर त्याने 5 फलंदाजांना बाद केले तर अजून कमाल कामगिरी समजली जाते. ट्वेंटी20 सामन्यात पाच बळी घेणे जवळपास अशक्‍य असते कारण कोणताच गोलंदाज चार पेक्षा जास्त षटके टाकू शकत नाही. कुलदीप यादवने ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर नेमके तेच करून दाखवले.

भारत विरुद्ध इंग्लंड दरम्यानच्या ट्वेंटी20 मालिकेला सुरुवात झाली आणि पहिल्याच सामन्यात भारतीय संघाने सर्वांगीण खेळ करून दाखवला. इंग्लंडने नुकत्याच संपलेल्या मालिकेत ऑस्ट्रेलियाच्या संघाला सर्व सामन्यात पराभवाचा झटका दिला होता. इंग्लंडच्या फलंदाजांना सापडलेली लय भारतीय गोलंदाजांना झेपणार नाही असे बोलले जात होते. त्या पार्श्वभूमीवर भारतीय संघाने अगदी सहज पहिला ट्वेंटी20 सामना जिंकला आणि सामन्यानंतर सर्वांच्या चर्चेचा विषय एकच होता, कुलदीप यादवची फिरकी गोलंदाजी. 

जोस बटलर, अॅलेक्‍स हेल्स, इयॉन मॉर्गन, ज्यो रुट आणि जॉनी बेअरस्टो सारख्या दादा फलंदाजांना बाद करताना कुलदीप यादवने टाकलेल्या गोलंदाजीचे सगळेचजण कौतुक करत होते. सामन्यानंतर कुलदीप यादव भेटला तेव्हा सामनावीर बक्षीस मिळाल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर विलसत होता. "ओल्ड ट्रॅफर्डच्या विकेटवर चेंडू खूप वळत नव्हता. मी विचार केला की चेंडूची गती कमी करायची आणि चेंडूला हवा द्यायची ज्याने चेंडू वळायची शक्‍यता वाढेल. तसेच फलंदाजाला खेळताना पुढचा पाय ताणून खेळावे लागेल असा टप्पा ठेवायचा. दुसऱ्या षटकापासून मला लय मिळाली'', कुलदीप सांगू लागला. 

"जोस बटलर कितीही चांगल्या लयीत असला तरी तो मला धोका घेऊन मोठे फटके मारणार नाही हे मला वाटले होते. म्हणून त्याला एकेरी धाव देऊन दुसऱ्या फलंदाजाला गोलंदाजी करायला मी भाग पाडले कारण त्यांनी मला कधी तोंड दिले नव्हते. त्यातून माझे गुगली एकदम टप्प्यावर पडले. मॉर्गन, ज्यो रुट आणि बेअरस्टोची विकेट एकाच षटकात मिळणे ही कमाल होती'', खूश होत कुलदीप यादवने सांगितले. 

चेंडूला उंची द्यायला हवी हे कितीही बोलले तरी ते प्रत्यक्षात करणे किती कठीण असते, असे विचारले असता कुलदीपने मस्त उत्तर दिले. "माझे गुरू कपिल सर मला नेहमी फिरकी गोलंदाजाने चेंडूला उंची देण्याचे महत्त्व पटवून सांगायचे. गोलंदाजी करताना ते काहीवेळा अगदी स्टंप शेजारी उभे राहून सांगायचे की, "फ्लाईट करना...डरना नहीं...बॅटस्‌मनको छक्के मारने दे...जब तक मार नहीं खाओगे तब तग अच्छे स्पीनर नहीं बनोगे'. म्हणून सांगतो माझ्या गुरूने मला मार खायला शिकवले. फलंदाज मला षटकार मारेल याची भीती मला कधीच वाटत नाही. हेच कारण असेल की कोणताही सामना असो मी चेंडूला हवा द्यायला बिचकत नाही. आणि हा गुण माझे बलस्थान झाला आहे. फिरकी गोलंदाजाने चेंडूला हवा देणे आणि जास्तीत जास्त चेंडू वळवायचा प्रयत्न करणे मोलाचे असते. चेंडू सोडल्यावर तो थोडासा जरी हवेत हलला तरी फलंदाजाला तो फटकवायला त्रास होतो. मी तेच करायचा प्रयत्न केला'', असे त्याने आपले गुरु कपिल यांची आठवण काढताना हसत हसत सांगितले. 

इंग्लंडच्या लांबलचक दौऱ्याची सुरुवात चांगल्या विजयाने झाल्याने भारतीय संघ उत्साहात कार्डीफला रवाना झाला आहे जिथे 6 तारखेला दुसरा टी20 सामना रंगणार आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kuldeep yadav talks in a press conference