भारताविरुद्धच्या मालिकेनंतर भविष्याचा निर्णय घेणार : मलिंगा 

वृत्तसंस्था
शनिवार, 2 सप्टेंबर 2017

मी संघासाठी सामने जिंकू शकत नसेन आणि संघाच्या गरजेनुसार कामगिरी करू शकत नसेन, तर मला संघात राहण्याचा अधिकारच नाही. 
लसिथ मलिंगा, श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज 

कोलंबो : भारताविरुद्धची एकदिवसीय सामन्यांची मालिका संपल्यानंतर आपण भविष्याविषयी अंतिम निर्णय घेऊ, असे श्रीलंकेचा अनुभवी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा याने सांगितले. 

भारताविरुद्धच्या मालिकेतील पहिले चारही सामने श्रीलंकेने गमावले असून, मालिकेतील एकच सामना बाकी आहे. चौथ्या एकदिवसीय सामन्यात मलिंगाने भारताचा कर्णधार विराट कोहलीला बाद करून एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीमधील तीनशेवी विकेट मिळविली. श्रीलंकेने हा सामना 168 धावांनी गमावला. या सामन्यात श्रीलंकेचे नेतृत्व करणारा मलिंगा पराभवानंतर बोलताना म्हणाला,""पायाच्या दुखापतीमुळे मी 19 महिने क्रिकेट खेळू शकलो नव्हतो. त्यानंतर पुनरागमनात मी झिंबाब्वे आणि भारताविरुद्धची मालिका खेळलो. मात्र, या दोन्ही मालिकेत मी चांगली कामगिरी करू शकलो नाही. भारताविरुद्धच्या मालिकेनंतर मी स्वतःच्या कामगिरीचे आत्मपरीक्षण करेन आणि शरीर आणखी किती काळ साथ देऊ शकेल याचा विचार करेन.'' 

चौथ्या सामन्यातील पराभवाविषयी बोलताना मलिंगा म्हणाला,""खेळपट्टीवर काही प्रमाणात हिरवळ होती. आम्ही चेंडू स्विंग करण्याचा प्रयत्न केला; पण त्याही पेक्षा अशा खेळपट्टीवर दिशा आणि टप्पा अचूक राखणे आवश्‍यक होते. आम्हाला ते जमले नाही. युवा क्रिकेटपटूंसाठी यातून धडा घेण्यासारखे आहे.'' या पराभवाचे खापर त्याने फलंदाजांवर फोडण्यास नकार दिला. तो म्हणाला,""आमच्या संघात एकही अनुभवी फलंदाज नाही. केवळ एंजेलो मॅथ्यूज हाच एकमेव अनुभवी होता. अशा वेळी फलंदाजीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर गोलंदाजांनी अचूक गोलंदाजी करणे आवश्‍यक होते. एकूणच अनुभवाचा आघाडीवर आमचा संघ कमी होता. या मालिकेने त्यांना खूप काही शिकवले असेल. श्रीलंका संघ आता अशा स्थितीत आहे की उभारी घेण्यासाठी त्यांना एका विजयाची नितांत आवश्‍यकता आहे.'' 

मी संघासाठी सामने जिंकू शकत नसेन आणि संघाच्या गरजेनुसार कामगिरी करू शकत नसेन, तर मला संघात राहण्याचा अधिकारच नाही. 
लसिथ मलिंगा, श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज 

Web Title: Lasith Malinga To Assess Sri Lanka Future After India Series