शिकण्याचे दिवस संपले; आता वर्चस्वच: कोहली

वृत्तसंस्था
शुक्रवार, 5 ऑगस्ट 2016


प्रत्येक सामन्यातून शिकणे, प्रत्येक मालिकेतून शिकणे हीच प्रक्रिया आणि हीच मानसिकता कायम राहिली, तर प्रतिकूल परिस्थितीमधूनही जिंकण्याची इच्छाशक्ती कधी निर्माणच होणार नाही. आता आम्ही स्वत:लाच आव्हान देण्याची गरज आहे आणि या संघातील सर्व खेळाडू यासाठी तयार आहेत, ही सुखद गोष्ट आहे.
- विराट कोहली, भारतीय संघाचा कर्णधार.

अँटिगा : ‘शिकण्याचे दिवस आता संपले आहेत. आता कसोटी क्रिकेटमध्ये वर्चस्व गाजवण्याची वेळ आहे,‘ अशा शब्दांत भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने विंडीजविरुद्ध विजय मिळविल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त केली. फलंदाजांनी उभारलेली मोठी धावसंख्या आणि गोलंदाजांच्या भेदकतेमुळे भारताने चौथ्या दिवशीच विंडीजवर डावाने विजय मिळविण्याची ऐतिहासिक कामगिरी केली.

या विजयानंतर कर्णधार कोहली म्हणाला, "निव्वळ कामगिरीच्या दृष्टिकोनातून पाहिले, तर हा परिपूर्ण विजय आहे. प्रत्येक संघाला असा विजय हवाच असतो. मायदेशाबाहेर खेळताना पहिल्या डावात वेगवान गोलंदाजांचा प्रभाव पडतो. चौथ्या आणि पाचव्या दिवशी खेळपट्टी संथ होते आणि फिरकी गोलंदाजांना साथ देऊ लागते. त्यावेळी फिरकी गोलंदाज प्रभावी ठरतात. पहिल्या डावात मोक्‍याच्या क्षणी फिरकी गोलंदाजांनीही बळी घेतले आणि दुसऱ्या डावात वेगवान गोलंदाजांनीही अशीच कामगिरी केली. या दोन्ही डावांमध्ये आमच्या सर्वच गोलंदाजांनी एकमेकांना उत्तम साथ दिली. आता आमचे तळातील फलंदाजही चांगले योगदान देऊ लागले आहेत. एकवेळ अशी परिस्थिती असे, की कसोटीमध्ये 350 धावांचा टप्पा गाठण्यासाठी झगडावे लागत असे. पण आता धावांचा डोंगर उभा करून डाव घोषित करण्याची क्षमता आणि कौशल्य या संघात आहे. त्यामुळे आता बदललेल्या मानसिकेतून खेळणे गरजेचे आहे.‘‘

कोहलीने या कसोटीमध्ये पाच गोलंदाज, पाच फलंदाज आणि एक यष्टिरक्षक-फलंदाज असे समीकरण निवडले होते. याचेही त्याने समर्थन केले. "संघात पाचच फलंदाज असतात, तेव्हा या सर्वांवरील जबाबदारी वाढलेली असते. या संघातील प्रत्येक जण तशी जबाबदारी पेलण्यासाठी सक्षम आहे. यापूर्वीही मी सांगितले आहे, की आता ‘खेळा आणि शिका‘ या परिस्थितीमध्ये आम्ही नाही. आता आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये आम्ही वर्चस्व राखण्यास सुरवात केली पाहिजे. प्रत्येक सत्रामध्ये चांगली कामगिरी करून, दडपणाचा सामना करूनच एखादा संघ दर्जेदार होतो,‘‘ असे कोहलीने सांगितले.
 

Web Title: 'Learning phase over, time to start dominating' - Kohli