भारतीय संघात मुंबईकर 'लिटील तेंडुलकर'; भारताची फलंदाजी

सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, 4 October 2018

सचिन तेंडुलकरची प्रतिकृती म्हणून पाहिला जाणारा मुंबईचा 18 वर्षीय पृथ्वी शॉ याने आज (गुरुवार) भारतीय कसोटी संघात पदार्पण केले. वेस्ट इंडीजविरुद्ध सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारताने पृथ्वी-केएल राहुल ही सलामीची जोडी निश्‍चित केली. पण, राहुल भोपळाही न फोडता पॅव्हेलियनमध्ये परतला. भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 

राजकोट : सचिन तेंडुलकरची प्रतिकृती म्हणून पाहिला जाणारा मुंबईचा 18 वर्षीय पृथ्वी शॉ याने आज (गुरुवार) भारतीय कसोटी संघात पदार्पण केले. वेस्ट इंडीजविरुद्ध सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारताने पृथ्वी-केएल राहुल ही सलामीची जोडी निश्‍चित केली. पण, राहुल भोपळाही न फोडता पॅव्हेलियनमध्ये परतला. भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 

वेस्ट इंडीजविरुद्धच्या या मालिकेतून आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी सलामीचा प्रश्‍न सोडवण्याचा भारतीय संघ व्यवस्थापनाचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर इंग्लंडमध्ये लागलेली पराभवाची गळतीही थांबवावी लागणार आहे. वेस्ट इंडीजच्या तुलनेत भारतीय संघाची ताकद मोठी असली, तरी श्रेष्ठत्व सिद्ध करणारा खेळ करावा लागणार आहे. या पहिल्या सामन्यासाठी जाहीर केलेल्या संघात हार्दिक पंड्याच्या अनुपस्थितीतही पाच गोलंदाजांसह खेळविण्यात आले आहेत. राजकोटची खेळपट्टी फिरकीस साह्य करणारी असेल. त्यामुळे आर. अश्‍विन, रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव असे फिरकी त्रिकूट असेल. महम्मद शमी आणि उमेश यादव यांच्यावर नव्या चेंडूची जबाबदारी असेल. 

ज्युनियर वर्ल्डकप ते कसोटी 
याच वर्षात भारताने पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली भारताने 19 वर्षांखालील विश्‍वकरंडक जिंकला होता. तेव्हापासून पृथ्वीच्या नावाची चर्चा सुरू झाली होती. रणजी क्रिकेट, प्रथम श्रेणी अ संघांतून मिळालेल्या संधीचे सोने करून पृथ्वीने सर्वांचे लक्ष वेधले होते. इंग्लंड दौऱ्यात शिखर धवन आणि मुरली विजय अपयशी ठरल्यामुळे त्याचा कसोटी संघातील मार्ग मोकळा झाला. इंग्लंड दौऱ्यात त्याचा समावेश करण्यात आला होता; परंतु अंतिम संघात खेळण्याची संधी मिळाली नव्हती. 

दुसरा सर्वांत लहान सलामीवीर 
उद्या पृथ्वी शॉ मैदानात येईल, तेव्हा तो देशाचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वांत लहान (18 वर्षे 329 दिवस) सलामीवीर ठरेल. सर्वांत लहान सलामीवीर म्हणून विजय मेहरा (17 वर्षे 265 दिवस) यांचा विक्रम आहे. 1955 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध ब्रेबॉर्न स्टेडियवर त्यांनी कसोटीत पदार्पण केले होते. 

प्रगतीचा आलेख
मुंबईतील शालेय क्रिकेटमध्ये धावांचा विक्रमी पाऊस पाडणारा पृथ्वी शॉ आत्तापर्यंत 14 प्रथम श्रेणी सामन्यात खेळला आहे. यामध्ये 56.72 च्या सरासरीने त्याने सात शतके आणि पाच अर्धशतके झळकावलेली आहेत. 2016 मध्ये रणजी पदार्पणातही त्याने शतक केले होते. वर्षानंतर दुलीप करंडक स्पर्धेतही पदार्पणात शतकी खेळी साकार केली होती. 

दृष्टिक्षेपात...
- पृथ्वी शॉ हा भारताचा 293वा कसोटीपटू ठरणार 
- वेस्ट इंडीज यापूर्वी भारतात 1994 मध्ये कसोटीत विजयी. त्यानंतर भारतात केवळ आठ कसोटी. 
- सध्या सक्रिय असलेल्या फलंदाजांमध्ये तीन हजार किंवा जास्त धावा केलेल्यांमध्ये क्रेग ब्रेथवेट याचा 41.63 हा स्ट्राइकरेट शेवटून दुसऱ्या क्रमांकाचा 
- पाकिस्तानच्या अझर अली याचा 41.50 स्ट्राइकरेट सर्वांत कमी 
- चेतेश्‍वर पुजारा कसोटी कारकिर्दीत पाच हजार धावांच्या टप्प्यापासून 191, तर के. एल. राहुल दोन हजार धावांच्या टप्प्यापासून 189 धावा दूर 
- भारत मायदेशात गेल्या दशकात सर्वाधिक वर्चस्व राखलेला संघ. विजय-पराभवाची सरासरी 7.5. 30 कसोटींत विजय, तर केवळ चार गमावल्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Little Tendulkar in Indias batting Sqaud