आसामविरुद्ध महाराष्ट्राची दमदार सुरवात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016

चेन्नई- विदर्भावरील निर्णायक विजयाने आत्मविश्‍वास उंचावलेल्या महाराष्ट्राने सोमवारपासून सुरवात झालेल्या आसामविरुद्धच्या रणजी लढतीतही दमदार सुरवात केली. केदार जाधवचे शतक आणि नौशाद शेखच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर महाराष्ट्राने पहिल्या दिवशी ५ बाद ३५२ धावा केल्या.

चेन्नई- विदर्भावरील निर्णायक विजयाने आत्मविश्‍वास उंचावलेल्या महाराष्ट्राने सोमवारपासून सुरवात झालेल्या आसामविरुद्धच्या रणजी लढतीतही दमदार सुरवात केली. केदार जाधवचे शतक आणि नौशाद शेखच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर महाराष्ट्राने पहिल्या दिवशी ५ बाद ३५२ धावा केल्या.

कर्णधारपद भूषविणाऱ्या स्वप्नील गुगळे आणि मुर्तझा ट्रंकवाल यांनी अर्धशतकी सलामी दिल्यानंतर महाराष्ट्राच्या डावाला काहीशी खीळ बसली. त्या वेळी एकत्र आलेल्या केदार जाधव आणि नौशाद शेख यांच्या भागीदारीमुळे महाराष्ट्राच्या डावाला आकार आला. या जोडीने १९२ चेंडूंत १८३ धावांची भागीदारी केली. केदार जाधवचे शतक साजरे झाले असले, तरी नौशाद पदार्पणात सलग तिसऱ्या शतकापासून केवळ तीन धावा दूर राहिला. 

केदार १०६ चेंडूंत १५ चौकार आणि तीन षटकारांसह ११५ धावांची खेळी करून बाद झाला. त्याच्या आक्रमक पवित्र्यामुळे आसामच्या गोलंदाजांवरील दडपण अधिक वाढले. त्यामुळे केदार बाद झाल्यानंतरही नौशाद आणि अंकित बावणे यांनी महाराष्ट्राचा डाव पुढे नेला. ही जोडी रंगात असतानाच नौशाद बाद झाला. त्याने १६३ चेंडूंत १२ चौकारांसह ९७ धावा केल्या. दिवसाच्या अखेरच्या सत्रात महाराष्ट्राचे दोन फलंदाज बाद करण्याचे समाधान आसामच्या गोलंदाजांना लाभले. नौशादपाठोपाठ अंकित बावणेदेखील बाद झाला. त्यानंतर चिराग खुराना आणि विशांत मोरे यांनी महाराष्ट्राचे आणखी नुकसान होऊ दिले नाही.

संक्षिप्त धावफलक ः
महाराष्ट्र पहिला डाव ९० षटकांत ५ बाद ३५२ (केदार जाधव ११५, नौशाद शेख ९७, स्वप्नील गुगळे ५०, अंकित बावणे ३८, मुर्तझा ट्रंकवाला २२, चिराग खुराणा खेळत आहे १४, विशांत मोरे खेळत आहे ९, जमालुद्दिन सईद अहमद २-६३, अबू अहमद १-५५, स्वरूपम पुरकायस्थ १-६४, मृण्मय दत्ता १-७८).

Web Title: Maharashtra energetic start