महाराष्ट्राची आसामवर डावाने मात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016

चेन्नई - महाराष्ट्राने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या ‘ब’ गटातील आव्हानात जान निर्माण केली आहे. आसामवर अखेरच्या चौथ्या दिवशी महाराष्ट्राने एक डाव ५२ धावांनी विजय मिळविताना बोनस गुणांसह सात गुणांची कमाई केली. त्यामुळे गुणतक्‍त्यात महाराष्ट्र नऊ संघांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे.

चेन्नई - महाराष्ट्राने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या ‘ब’ गटातील आव्हानात जान निर्माण केली आहे. आसामवर अखेरच्या चौथ्या दिवशी महाराष्ट्राने एक डाव ५२ धावांनी विजय मिळविताना बोनस गुणांसह सात गुणांची कमाई केली. त्यामुळे गुणतक्‍त्यात महाराष्ट्र नऊ संघांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे.

महाराष्ट्राच्या ५४२ धावांसमोर आसामचा पहिला डाव २५६ धावांत संपला होता. २८६ धावांच्या पिछाडीमुळे फॉलोऑनच्या नामुष्कीनंतर त्यांची ६ बाद ११५ अशी खराब स्थिती झाली होती. डावाची हार टाळण्यासाठी त्यांना १७१ धावांची गरज होती आणि केवळ चार विकेट बाकी होत्या. कर्णधार के. बी. अरुण कार्तिक याच्यावर त्यांच्या आशा होत्या. काल तो ३३ धावांवर नाबाद होता. त्याने ८७ धावांपर्यंत मजल मारली. तो नाबाद राहिला. याशिवाय स्वरूपम पुरुकायस्थ यानेही ६९ धावांची खेळी केली; पण त्यानंतरही त्यांचा डाव २३४ धावांत संपुष्टात आला. सातव्या विकेटसाठी अरुण कार्तिक-स्वरूपम यांनी १७ षटकांत ९१ धावांची भागीदारी रचली; पण त्यांना पराभव थोडा लांबविता आला इतकेच. डावखुरा फिरकी गोलंदाज बच्छावने पुरुकायस्थला बाद करून ही जोडी फोडली. त्यानंतर आसामचा डाव फारसा लांबला नाही. महाराष्ट्राकडून दुसऱ्या डावात अनुपम संकलेचा व मोहसीन सय्यद यांनी प्रत्येकी चार विकेट घेतल्या. पहिल्या डावात आठ विकेट टिपलेल्या संकलेचाने एकूण १२ विकेट घेतल्या. 

धावफलक
महाराष्ट्र ः पहिला डाव ः ५४२, आसाम ः पहिला डाव ः २५६, आसाम ः दुसरा डाव ः (६ बाद ११५ वरून) के. बी. अरुण कार्तिक नाबाद ८७-१७७ चेंडू, १० चौकार, स्वरूपम पुरुकायस्थ झे. मोहसीन गो. बच्छाव ६९-५७ चेंडू, १३ चौकार, अबू नेचीम अहमद त्रि. गो. मोहसीन ०, अरुप दास झे. मोरे गो. मोहसीन १, मृण्मय दत्ता त्रि. गो. संकलेचा ०, अवांतर ३, एकूण ७३ षटकांत सर्वबाद २३४

बाद क्रम ः ७-१९८, ८-२००, ९-२१८. 

गोलंदाजी ः अनुपम संकलेचा १८-३-७१-४, मोहसीन सय्यद १८-४-४७-४, सत्यजित बच्छाव १३-१-४१-१, चिराग खुराणा १९-१-६२-१, अक्षय दरेकर ५-२-१३-०.

Web Title: Maharashtra win by an innings