दहा वर्षांनी लहान असलेल्यांनाही धोनी हरवू शकतो: शास्त्री

वृत्तसंस्था
Tuesday, 26 December 2017

धोनी केवळ भारतातच नव्हे तर क्रिकेट विश्‍वातील सर्वोत्तम यष्टिरक्षक आहे. त्याच्याकडे अशा काही क्‍लृप्त्या आहेत, त्या मार्केटमध्ये विकल्या जात नाहीत आणि मिळतही नाहीत. 
- रवी शास्त्री, मुख्य प्रशिक्षक

मुंबई : आपल्यापेक्षा 10 वर्षांनी तरुण असलेल्या खेळाडूंपेक्षा महेंद्रसिंह धोनीच्या चपळतेशी तुलना कोणाशीही होऊ शकत नाही, असे प्रशिक्षक रवी शास्त्री यांचे म्हणणे आहे. जे कोणी धोनीवर टीका करत आहेत, ते वयाच्या 36 व्या वर्षी काय करत होते, याचा विचार करावा, असा टोलाही शास्त्री यांनी हाणला. 

मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये धोनीच्या स्थानाबाबत काही माजी खेळाडूंसह काही जण टीका करत आहेत; परंतु कर्णधार विराट कोहलीसह रवी शास्त्री धोनीच्या पाठीशी ठाम उभे आहेत. 

आम्ही मूर्ख नाही, मी हा खेळ गेली 30-40 वर्षांपासून जवळून पाहत आहे. विराटही दशकापासून या संघाचा भाग आहे. या वयात धोनी 26 वर्षांच्या खेळाडूलाही चपळतेच्या निकषावर पराभूत करू शकतो. या वयात आपण किती चपळ होतो, असे त्याच्यावर टीका करण्यापूर्वी विचार करावा, असे सडेतोड मत शास्त्री यांनी व्यक्त केले. 
यष्टिमागची धोनीची ही चपळता निवड समितीचे अध्यक्ष एम. एस. के. प्रसाद यांनीही अनुभवली आहे, म्हणूनच 2019 च्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेपर्यंत धोनी संघात असेल, असे त्यांनी सूतोवाच केले आहे. 

धोनीबाबत प्रश्‍नचिन्ह उभे करणाऱ्यांनी आरशासमोर उभे राहून 36 व्या वर्षी आपली काय अवस्था होती, हा प्रश्‍न स्वतःला विचारा. धोनीएवढे चपळतेने दोन धावा पळण्याची क्षमता त्यांच्यामध्ये होती का, ते जेवढ्या वेगात दोन धावा पळत होते, त्याच वेळेत धोनी तिसरी धाव काढत असतो. म्हणूनच दोन विश्‍वकरंडक जिंकून देणाऱ्या या खेळाडूची सरासरी 51 धावांची आहे. सध्यातरी धोनीसाठी पर्याय असेल असा खेळाडू नाही, असे शास्त्री यांनी म्हटले आहे. 

धोनी कसोटी क्रिकेट खेळत नाही, त्यामुळे 2019 च्या विश्‍वकरंडक स्पर्धेपर्यंत तो मर्यादित षटकांचे क्रिकेट सहज खेळू शकतो, असे शास्त्री यांनी म्हटले आहे. 

धोनी केवळ भारतातच नव्हे तर क्रिकेट विश्‍वातील सर्वोत्तम यष्टिरक्षक आहे. त्याच्याकडे अशा काही क्‍लृप्त्या आहेत, त्या मार्केटमध्ये विकल्या जात नाहीत आणि मिळतही नाहीत. 
- रवी शास्त्री, मुख्य प्रशिक्षक
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahendra Singh Dhoni at 36 is fitter than bunch of 26 year olds says Ravi Shastri