esakal | धोनी को रन-आऊट करना, मुश्किल ही नहीं.. नामुमकिन है!
sakal

बोलून बातमी शोधा

Mahendra Singh Dhoni

'कधी रिटायर होणार आहेस तू' अशा आशयाच्या त्या आडवळणाच्या प्रश्‍नाचं उत्तर धोनीनं फार मजेशीर पद्धतीने दिले होते. त्या पत्रकारालाच शेजारी बसवून 'मी निवृत्त व्हावे, अशी तुझी इच्छा आहे का' वगैरे प्रश्‍न विचारले.. त्यात धोनीनं विचारलं होतं, 'सामन्यामध्ये माझी 'रनिंग बिटविन द विकेट्‌स' पाहून मी अनफिट आहे असं वाटतं का..?' अर्थातच त्या पत्रकारानं याचं उत्तर 'नाही' असंच दिलं.. 

धोनी को रन-आऊट करना, मुश्किल ही नहीं.. नामुमकिन है!

sakal_logo
By
गौरव दिवेकर

साधारणत: वर्षभरापूर्वीची घटना आहे.. ट्‌वेंटी-20 विश्‍वकरंडक स्पर्धा भारतात झाली होती.. त्या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताला वेस्ट इंडीजकडून पराभव स्वीकारावा लागला होता. सदानकदा 'ब्रेकिंग न्यूज'च्या शोधात असणारी माध्यमं या पराभवानंतरही अर्थातच एखादी 'न्यूज' शोधत होतेच. रिवाजाप्रमाणे सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेला महेंद्रसिंह धोनी आला होता. तेव्हा तो कर्णधार होता. पत्रकार परिषदेमध्ये एका परदेशी पत्रकाराने त्याला विचारलं..'एखादा क्रिकेटपटू जे जे काही साध्य करू शकतो, ते सर्व तू केलं आहेस.. आता अजूनही पुढे खेळत राहण्याची तुझी इच्छा आहे?' 

'कधी रिटायर होणार आहेस तू' अशा आशयाच्या त्या आडवळणाच्या प्रश्‍नाचं उत्तर धोनीनं फार मजेशीर पद्धतीने दिले होते. त्या पत्रकारालाच शेजारी बसवून 'मी निवृत्त व्हावे, अशी तुझी इच्छा आहे का' वगैरे प्रश्‍न विचारले.. त्यात धोनीनं विचारलं होतं, 'सामन्यामध्ये माझी 'रनिंग बिटविन द विकेट्‌स' पाहून मी अनफिट आहे असं वाटतं का..?' अर्थातच त्या पत्रकारानं याचं उत्तर 'नाही' असंच दिलं.. 

हे वर्षभरापूर्वीचं प्रकरण पुन्हा सांगण्याचं कारणही धोनीच आहे.. परवाच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्‌वेंटी-20 सामन्यात धोनी आणि केदार जाधव यांच्या 'रनिंग बिटविन द विकेट्‌स'चा एक व्हिडिओ कालपासून सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला आहे. 'स्टार स्पोर्टस'ने तो व्हिडिओ ट्‌विट केला आहे. या व्हिडिओचं वैशिष्ट्य म्हणजे त्यात धोनी आणि केदार यांच्या धावण्याचा वेग 'किलोमीटर प्रतितास' असा दाखविला आहे. हा व्हिडिओ पाहा आणि त्यातल्या धोनी व केदारसमोर लिहिलेले वेगाचे आकडे निरखून पाहा.. ज्यावेळी धोनीचा धावण्याचा वेग 31 किलोमीटर प्रतितास होता, त्याच वेळी केदारचा वेग 16 किलोमीटर प्रतितास होता. 

अर्थात क्षेत्ररक्षकाचा थ्रो यष्टिरक्षकाकडे जात होता आणि धोनी त्या दिशेने धावत असल्याने त्याचा वेग केदारपेक्षा जास्त असणे स्वाभाविक आहे; पण तरीही वयाच्या 36 व्या वर्षी इतका तंदुरुस्त क्रिकेटपटू कदाचित भारताकडे यापूर्वी कुणी नव्हता. गेल्या वर्षीच्याच ट्‌वेंटी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेत बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात शेवटच्या चेंडूवर धोनीने केलेला धावबादही असाच क्रिकेटप्रेमींच्या कायमच्या स्मरणात राहणारा आहे.