आयसीसीच्या कार्याध्यक्षपदी मनोहर दुसऱ्यांदा बिनविरोध

वृत्तसंस्था
Wednesday, 16 May 2018

आयसीसीच्या कार्याध्यक्षपदी पुन्हा नियुक्त होणे हा बहुमान आहे. आयसीसीच्या संचालकांनी कायम ठेवलेल्या विश्‍वासामुळे शक्‍य आहे. आम्ही एकत्रितपणे काम करताना गेल्या दोन वर्षांत मोठी कामगिरी केली. दोन वर्षांपूर्वी निवड होताना दिलेली सर्व आश्‍वासने मी पूर्ण केली याचे समाधान आहे. 
- शशांक मनोहर 

 नवी दिल्ली - शशांक मनोहर यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) स्वतंत्र कार्यभार असलेल्या कार्याध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली. या पदासाठी दुसरे कोणीही शर्यतीत नव्हते. 
2016 मध्ये आयसीसीने प्रथमच स्वतंत्र कारभार असलेले कार्याध्यक्षपद तयार केले होते आणि त्या जागेवर शशांक मनोहर बिनविरोध नियुक्त झाले होते. दोन वर्षांच्या या काळात मनोहर यांनी आयसीसीच्या कारभारात सुसूत्रता आणली. एवढेच नव्हे, 2014 मध्ये तयार झालेले प्रत्येक देशांना मिळणारा आर्थिक हिस्सा विभागणीरचनेत बदल करून सर्व संलग्न देशांना योग्य न्याय मिळणारी नवी रचना तयार केली. या वेळी त्यांनी बीसीसीआयचा विरोधही जुमानला नाही. त्यानंतर महिला संचालक पदासाठीही जागा तयार केली. 
पुढील दोन वर्षांत आम्ही सर्व सदस्य देशांना एकत्रित घेऊन क्रिकेटच्या व्याप्तीसाठी जागतिक रचना करणार आहोत, त्यामुळे सर्वांना क्रिकेटचा आनंद घेता येईल. सध्या क्रिकेटला चांगले दिवस आहेत. चांगले काम करून त्याला अधिक बळकटी द्यायची आहे, असे मनोहर यांनी सांगितले. 

आयसीसीच्या कार्याध्यक्षपदी पुन्हा नियुक्त होणे हा बहुमान आहे. आयसीसीच्या संचालकांनी कायम ठेवलेल्या विश्‍वासामुळे शक्‍य आहे. आम्ही एकत्रितपणे काम करताना गेल्या दोन वर्षांत मोठी कामगिरी केली. दोन वर्षांपूर्वी निवड होताना दिलेली सर्व आश्‍वासने मी पूर्ण केली याचे समाधान आहे. 
- शशांक मनोहर 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Manohar becomes the ICC's working president for the second time