esakal | विश्‍वकरंडकाच्या तयारीला आजपासून सुरवात 
sakal

बोलून बातमी शोधा

Virat Kohli MS Dhoni

विश्‍वकरंडकाच्या तयारीला आजपासून सुरवात 

sakal_logo
By
सुनंदन लेले

डर्बन : आव्हानात्मक खेळपट्टीवर तिसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेवर मिळविलेल्या विजयाने आत्मविश्‍वास उंचावलेला भारतीय संघ आता एकदिवसीय क्रमवारीत अव्वल क्रमांकाचे उद्दिष्टच डोळ्यांसमोर ठेवून एकदिवसीय मालिकेत उतरेल यात शंका नाही; पण त्यापेक्षा अवघ्या 14 महिन्यांवर आलेल्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या तयारीचा एक भाग म्हणूनही दोन्ही संघांनी या मालिकेकडे बघितल्यास आश्‍चर्य वाटणार नाही. सहा एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना उद्या डर्बनच्या किंग्जमेड मैदानावर होणार आहे. 

आत्मविश्‍वास उंचावलेला भारतीय संघ आणि आत्मविश्‍वासास ठेच पोचलेला दक्षिण आफ्रिका संघ यांच्यातील मैदानावरील चुरस आता अधिकच रंगणार आहे. पहिल्या सामन्यावर सध्या तरी पावसाचे सावट आहे. वॉंडरर्सच्या मैदानावर भारतीय संघ कधी हरलेला नाही. हा इतिहास तिसऱ्या कसोटीत कायम राहिला. पहिल्या सामन्यातील किंग्जमेड मैदानावर भारतीय संघ कधी जिंकलेला नाही, हा इतिहास आहे आणि हेच आव्हान भारतीय संघाला साद घालत आहे. डिव्हिलर्स पहिल्या तीन सामन्यांत खेळणार नसल्याचा फटका दक्षिण आफ्रिकेला बसू शकतो. त्याचा फायदा भारतीय संघ उठविण्याचा प्रयत्न करील. 

एकदिवसीय क्रिकेट हे एकदम भिन्न आहे. त्यामुळे गोलंदाजीपेक्षा फलंदाजीची फळी भक्कम करण्यावर भारत भर देईल, असे वाटते. मधल्या फळीत स्थान मिळविण्यासाठी मोठी स्पर्धा आहे. त्यासाठी केदार जाधव, श्रेयस अय्यर, मनीष पांडे आणि दिनेश कार्तिक यांचा समावेश आहे. अजिंक्‍य रहाणेचाही विचार होऊ शकतो. सलामीसाठी शिखर धवन, रोहित शर्मा ही जोडी असेल. या मैदानाची खेळपट्टी फिरकीला साथ देणारी असल्यामुळे युजवेंद्र चहलबरोबर दुसऱ्या फिरकी गोलंदाजासाठी कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांच्यात चुरस असेल. भुवनेश्‍वर, बुमरा आणि शमी या कसोटीतील यशस्वी त्रिकुटावर नव्या चेंडूची जबाबदारी राहील. यातील दोघांनाच संधी मिळू शकते. कारण, गरज पडल्यास केदार जाधव आणि हार्दिक पंड्याचा उपयोग केला जाईल. 

दक्षिण आफ्रिकेकडे डिव्हिलर्स नसला तरी, त्याची उणीव भासणार नाही. जेपी ड्युमिनी, डेव्हिड मिलर, डू प्लेसिस या मधल्या फळीबरोबरच हशिम आमला आणि क्विटॉन डिकॉक या सलामीच्या जोडीवर त्यांच्या आशा असतील. मात्र, त्यांची मुख्य ताकद वेगवान गोलंदाजीच राहील आणि त्याला इम्रान ताहीरच्या फिरकीची साथ मिळेल. 

loading image
go to top