2003 च्या त्या संघात धोनी हवा होता : गांगुली 

वृत्तसंस्था
Thursday, 1 March 2018

नवी दिल्ली : 'भारताचा आतापर्यंतचा सर्वोत्तम कर्णधार कोण' यावर त्या दोघांच्या चाहत्यांमध्ये भलेही वाद होत असतील.. पण सौरभ गांगुली आणि महेंद्रसिंह धोनी यांचे संबंध कायमच सौहार्दाचे आहेत. किंबहुना, 'गांगुलीच्या निवृत्तीमागे धोनीचाच हात होता' असा काही चाहत्यांचा आरोप असला, तरीही खुद्द गांगुलीने मात्र धोनीला त्याच्या सर्वांत आवडत्या भारतीय संघात स्थान दिले आहे. 

नवी दिल्ली : 'भारताचा आतापर्यंतचा सर्वोत्तम कर्णधार कोण' यावर त्या दोघांच्या चाहत्यांमध्ये भलेही वाद होत असतील.. पण सौरभ गांगुली आणि महेंद्रसिंह धोनी यांचे संबंध कायमच सौहार्दाचे आहेत. किंबहुना, 'गांगुलीच्या निवृत्तीमागे धोनीचाच हात होता' असा काही चाहत्यांचा आरोप असला, तरीही खुद्द गांगुलीने मात्र धोनीला त्याच्या सर्वांत आवडत्या भारतीय संघात स्थान दिले आहे. 

गांगुलीच्या 'अ सेंच्युरी इज नॉट इनफ' या आत्मचरित्रामध्ये त्याने धोनीचाही आवर्जून उल्लेख केला आहे. '2003 च्या विश्‍वकरंडक स्पर्धेत खेळलेल्या भारतीय संघामध्ये धोनी असायला हवा होता, असं मला सतत वाटतं' असा उल्लेख गांगुलीने त्यात केला आहे. 2003 मध्ये गांगुलीच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने अंतिम सामन्यापर्यंत धडक मारली होती. 

'कर्णधारपदी असताना मी कायम ताज्या दमाच्या खेळाडूंच्या शोधात असायचो. प्रचंड दडपणाखालीही शांत राहू शकणारे आणि कोणत्याही क्षणी सामन्याचे पारडे फिरविण्याची क्षमता असणारे खेळाडू मी शोधत होतो. 2004 मध्ये मी धोनीला प्रथम पाहिले. पहिल्या दिवसापासून धोनीच्या व्यक्तिमत्वाचा माझ्यावर प्रभाव पडला होता. 2003 च्या त्या संघात धोनी असायला हवा होता, असं सतत वाटतं. मला नंतर समजलं, की आम्ही 2003 च्या विश्‍वकरंडक स्पर्धेत खेळत होतो, तेव्हाही धोनी भारतीय रेल्वेमध्ये तिकिट कलेक्‍टरच होता.. हे केवळ अविश्‍वसनीय आहे..!', असा उल्लेख गांगुलीने त्यात केला आहे. 

'भारतीय क्रिकेट संघात झुंजारपणा आणणारा कर्णधार' म्हणून ओळख असलेल्या गांगुलीला त्याच्या कारकिर्दीतील शेवटच्या कसोटी सामन्याचे नेतृत्त्व करण्याची विनंती तत्कालीन कर्णधार धोनीने केली होती. पण गांगुलीने यास नकार दिला होता. याचाही उल्लेख गांगुलीच्या आत्मचरित्रात करण्यात आला आहे.

'नागपूरमधील तो कसोटी सामना संपायला आला होता. अचानक धोनीने मला आश्‍चर्याचा धक्का दिला. त्याने मला संघाचे नेतृत्त्व करण्यास सांगितले. त्याआधीही मी त्याची ही ऑफर नाकारली होती; पण त्यावेळी नाकारू शकलो नाही. योगायोगानं, आठ वर्षांपूर्वी त्याच दिवशी कर्णधार म्हणून माझ्या कारकिर्दीस सुरवात झाली होती. नागपूरमध्ये मी क्षेत्ररचनेत काही बदल केले आणि गोलंदाजांनाही थोड्या-फार सूचना दिल्या. त्यावेळी ऑस्ट्रेलियाचा शेवटचा फलंदाज मैदानात होता. पण त्या वेळी मला नेत्तृत्वावर लक्ष केंद्रीत करणे अवघड जात होते. म्हणून तीन षटके नेतृत्त्व केल्यानंतर मी पुन्हा ही जबाबदारी धोनीकडे सोपविली.. आम्ही दोघंही हसलो..!', असे गांगुलीने लिहिले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news cricket news 2003 Cricket world cup India team MS Dhoni Saurav Ganguly