तनिष्कने केली 1045 धावांची नाबाद विश्‍वविक्रमी खेळी

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 31 January 2018

क्रिकेटचा सराव करताना मनीष सरांनी प्रणव धनावडेने केलेल्या विक्रमाचे टार्गेट माझ्यासमोर ठेवले होते. ते टार्गेट ब्रेक करण्यासाठीच माझा कसून सराव सुरू होता. या खेळीच्या प्रशिक्षकांनी दिलेल्या ट्रिक्‍सचा खूपच फायदा झाला. 
- तनिष्क गवते 

मुंबई : मुंबईच्या शालेय क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पडण्याची मालिका कायम राहिली. नवी मुंबई शिल्ड या नवी मुंबईतील शालेय क्रिकेट स्पर्धेत कोपरखैरणेतील तनिष्क गवतेने 1045 धावांचा विक्रम करत प्रणव धनावडेने दोन वर्षांपूर्वी केलेला 1009 धावांचा विक्रम मागे टाकला. 

कोपरखैरणेतील यशवंतराव चव्हाण शाळेच्या मैदानावर झालेल्या या स्पर्धेत तनिष्कने चौदाव्या वर्षीच हा विक्रम करत प्रणवला याबाबतीतही एका वर्षाने मागे टाकले. 5 जानेवारीस प्रणवने 323 चेंडूंत 1009 धावांची नाबाद खेळी केली होती, तर आता तनिष्कने 149 चौकार आणि 67 षटकारांची आतषबाजी करत नाबाद 1045 धावा केल्या. तनिष्कच्या यशवंतराव चव्हाण संघाने या दोनदिवसीय सामन्यात 3 बाद 1324 धावांचा डोंगर रचला. तनिष्कच्या खालोखाल धावा सीराज चासकर याच्या होत्या. तनिष्कबरोबरच सलामीस आलेल्या सीराजने 77 धावा केल्या. त्यांनी यशवंतराव चव्हाण इंग्लिश मीडियम स्कूलला अवघ्या 63 धावांतच गुंडाळले. 

तनिष्क शालेय क्रिकेटमध्ये नवा नाही. त्याने गाइल्स तसेच हॅरिस स्पर्धेत सातत्याने धावा केल्या आहेत. आता त्याने नवी मुंबईतील स्पर्धेत आपली ताकद दाखवली. लहानपणी घरच्यांच्या आग्रहाखातर जिम्नॅस्टिक, स्केटिंग करत असलेल्या तनिष्कचा ओढा क्रिकेटकडे होता. त्याची प्रखर इच्छा पाहून त्याला क्रिकेटकडे पाठवले, असे तनिष्कचे मामा अशोक मढवी यांनी सांगितले. 

तनिष्कची या सामन्यातील फलंदाजी चौफेर होती. अर्थातच त्याच्या आवडत्या पूल आणि हूकचा त्याने सढळ वापर केला. डावाच्या सुरवातीस 40 धावांवर असताना सीमारेषेवर सुटलेला खूपच अवघड झेल सोडल्यास त्याची खेळी निर्दोष होती. क्वचितप्रसंगी त्याचे शॉटस्‌ चुकले; पण त्याची हुकूमत वाखाणण्याजोगी होती. त्याने प्रतिस्पर्धी संघातील 13 गोलंदाजांना (मुंबईतील शालेय क्रिकेटमध्ये 11 जण फलंदाजीसाठी आणि 14 जण गोलंदाज - क्षेत्ररक्षणासाठी हा नियम आहे) कोणतीही दाद दिली नाही. त्याला बाद करण्यात तर सोडाच, चकवण्यातही सर्वांनाच अपयश आले. त्यातील कैफने 263, हसनने 270 धावा दिल्या. 

भागीदारी 798 धावांची, सहकाऱ्याच्या धावा 16 
तनिष्कचा धडाका सुरू असल्याने त्याच्या सर्वच सहकाऱ्यांनी साथ देण्याची भूमिका घेतली. पहिल्या विकेटसाठी 484 धावांची सलामी झाली. त्यात त्याचा सहकारी सीराजच्या धावा 77 होत्या, तर त्याने शैलेशबरोबर चौथ्या विकेटसाठी नाबाद 798 धावा जोडल्या. त्यात शैलेशचा वाटा अवघ्या 16 धावांचा होता. तनिष्कचा धडाका बघून त्याच्या सहकाऱ्यांना स्ट्राइक तनिष्कलाच देण्याची सूचना होती, असे या संघाचे मार्गदर्शक मनीष सर यांनी सांगितले. 

दोन वर्षांतच नवा विक्रम 
प्रणव धनावडेने एक हजार धावांचा विक्रम केला होता, त्या वेळी त्याने 1988 मध्ये एडजे कॉलिन्सने केलेला 628 धावांचा विक्रम मोडला होता; पण आता प्रणवचा विक्रम तनिष्कने दोन वर्षांतच मागे टाकला आहे. 

क्रिकेटचा सराव करताना मनीष सरांनी प्रणव धनावडेने केलेल्या विक्रमाचे टार्गेट माझ्यासमोर ठेवले होते. ते टार्गेट ब्रेक करण्यासाठीच माझा कसून सराव सुरू होता. या खेळीच्या प्रशिक्षकांनी दिलेल्या ट्रिक्‍सचा खूपच फायदा झाला. 
- तनिष्क गवते 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news cricket news Mumbai Tanishq Gavate hammers 1046 runs in school game