धवनचे शतक; पण फिरकीने रोखली भारताची घोडदौड 

Saturday, 12 August 2017

पल्लिकल : शिखर धवनचे शतक आणि त्याने 'विक्रमी' के. एल. राहुलबरोबर दिलेल्या भक्कम सलामीमुळे श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताने जबरदस्त सुरवात केली. धवन (119) आणि राहुल (85) यांनी 188 धावांची सलामी दिली. पुष्पकुमारा आणि संदकन या दोन फिरकी गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांची घोडदौड रोखली. या दोघांनी मिळून पाच गडी बाद केले. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला, तेव्हा भारताने सहा गडी गमावून 329 धावा केल्या होत्या. सलामीच्या भक्कम भागीदारीनंतर सहा गडी बाद करत श्रीलंकेने स्थानिक प्रेक्षकांना खुश केले. 

नाणेफेक जिंकण्याच्या बाबतीत विराट कोहली तिसऱ्यांदा नशीबवान ठरला. अपेक्षेप्रमाणे भारतीय संघात कुलदीप यादवचा समावेश झाला. श्रीलंकेने संघात तीन बदल केले. पल्लिकलच्या सुरेख खेळपट्टीवर धवन-राहुलने सहज फलंदाजी केली. दोघांनी मनसोक्त फटकेबाजी केली. आक्रमक फटका मारण्याच्या प्रयत्नांत राहुलचा उडालेला झेल सोडला, तेव्हा तो फक्त 26 धावांवर खेळत होता. पहिल्या कसोटीप्रमाणेच धवनने आजही चौकारांचा सपाटा लावला. त्याने 45 चेंडूंतच अर्धशतकी मजल मारली. पाठोपाठ राहुलनेही अर्धशतक झळकाविले. हे अर्धशतक विक्रमी होते. सलग सातव्या डावात त्याने अर्धशतक झळावित राहुल द्रविडचा विक्रम मागे टाकला. उपाहारापूर्वीच भारताने 130 धावा फटकाविल्या होत्या. 

शिखर धवनने शतकी मजल मारताना 15 चौकार फटकाविले. हवेतून फटका मारण्याच्या प्रयत्नांत राहुलने सहज शक्‍य असलेले शतक गमावले. तो 85 धावांवर बाद झाला. 188 धावा दिल्यानंतर श्रीलंकेला पहिले यश मिळाले. 

या खेळपट्टीवर भारतीय फलंदाज दादागिरी करणार, असे वाटत असतानाच पुष्पकुमारा आणि संदकन या फिरकी गोलंदाजांनी टिच्चून मारा केला. शिखर धवन 119 धावांवर बाद झाल्यावर मधल्या फळीतील फलंदाजांसमोर फिरकी गोलंदाजांनी अडचणी उभ्या केल्या. चेतेश्‍वर पुजारा, अजिंक्‍य रहाणे आणि विराट कोहली फार मोठे योगदान न देता तंबूत परतले. एक बाद 219 या धावसंख्येवरून भारताची अवस्था 5 बाद 296 अशी झाली. खेळ संपण्यासाठी तीन षटके शिल्लक असतानाच फर्नांडोने आर. आश्‍विनला बाद केले. वृद्धिमान साहा आणि हार्दिक पांड्यासह तळातील फलंदाज किती धावसंख्या वाढवू शकतात, हे पाहण्याची आता उत्सुकता आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news marathi website sports news India versus Sri Lanka