अडीच दिवसांत श्रीलंकेचा खेळ खल्लास..! 

Monday, 14 August 2017

अगासीने वयाची तिशी पार केल्यावरच कमाल कामगिरी करून दाखवली. धोनीचे तसेच आहे. अजून तो एकदम तंदुरुस्त आहे आणि सर्वोच्च पातळीवर खेळायची त्याची जिद्द अचाट आहे. म्हणून तो संघात आहे. जर त्याच्या कामगिरीत कमतरता जाणवली तर आम्ही वेगळा विचार करू

पल्लिकल : भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीमध्ये श्रीलंकेने अडीच दिवसांतच शरणागती पत्करत नवा तळ गाठला. पल्लिकल स्टेडियमवर झालेल्या तिसऱ्या कसोटीत भारताने एक डाव आणि 171 धावांनी विजय मिळविला. पहिल्या डावात श्रीलंकेचा संघ 34.4 षटकांत बाद झाला होता; तर दुसऱ्या डावात महंमद शमी आणि आर. आश्‍विनच्या गोलंदाजीवर त्यांची भंबेरी उडाली. तिसऱ्या दिवशी चहापानाला श्रीलंकेचा शेवटचा फलंदाज आश्‍विनने बाद केला आणि भारतीयांनी 3-0 मालिका विजयाचा आनंद एकमेकांना मिठ्या मारत साजरा केला. आक्रमक शतक झळकाविणाऱ्या हार्दिक पांड्याला 'सामनावीर' घोषित करण्यात आले. 'मालिकेचा मानकरी' हा पुरस्कार शिखर धवनला देण्यात आला. 

तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरवात झाल्यानंतर करुणारत्नेला बाद करून आश्‍विनने पहिला धक्का दिला. दुसऱ्या बाजूने महंमद शमीने अफलातून वेगवान गोलंदाजी केली. त्याने प्रत्येक चेंडू तुफान वेगाने टाकला. त्याचा प्रत्येक चेंडू फलंदाजाला अडचणीत आणत होता. त्याने पुष्पकुमार आणि कुशल मेंडिसला बाद केले. कर्णधार दिनेश चंडिमलने अँजेलो मॅथ्यूजसह दोन तास भारतीय गोलंदाजांचा प्रतिकार केला. 

उपाहारानंतर कुलदीप यादवने चंडिमलला, तर आश्‍विनने मॅथ्यूजला बाद केले आणि सामन्यातील विजयाचा 'काऊंटडाऊन' सुरू झाला. तळातील फलंदाज डिकवेलाने 41 धावा करत चमक दाखविली; पण भारतीय गोलंदाजांना तो रोखू शकला नाही. अखेर चहापानाला श्रीलंकेचा डाव 181 धावांत गुंडाळून भारताने दणदणीत विजय मिळविला. शमीने तीन, तर आश्‍विनने चार गडी बाद केले. उमेश यादवने दोन आणि कुलदीप यादवने एक गडी बाद केला. हा सामना तिसऱ्याच दिवशी संपल्याने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यापूर्वी भारतीय खेळाडूंना पाच दिवसांची विश्रांती मिळणार आहे. 

खेळाडूंना आलटून पालटून संधी देणार : प्रसाद 
निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी येत्या सहा महिन्यात निवड समिती 2019 वर्ल्डकप तयारीच्या दृष्टीने काय विचार करत आहे हे सांगितले. "खूप जास्त एक दिवसीय सामने भारतीय संघ येत्या सहा महिन्यात खेळणार असल्याने निवड समितीने 25 खेळाडूंचा चमू डोक्‍यात ठेवून आलटून पालटून संधी देण्याचा विचार पक्का केला आहे. जडेजा आणि अश्‍विनला विश्रांती देण्यामागे तोच विचार आहे. भारतीय 'अ' संघाकडून ज्या खेळाडूंनी सातत्याने कामगिरी केली त्या मनीष पांडे आणि शार्दूल ठाकूरला मुख्य संघात संधी दिली गेली आहे. 2019 वर्ल्डकपची तयारी करत असताना निवड समितीने खास करून फिटनेसवर लक्ष केंद्रित केले आहे. भारतीय संघात खेळू इच्छिणाऱ्या खेळाडूंची पायाभूत तंदुरुस्तीचे निकष डोक्‍यात ठेवले गेले आहेत. जे खेळाडू त्या निकषात बसत नाहीत त्यांचा मुख्य संघाकरता विचार केला जाणार नाही''. 

"भारतीय "अ' संघाला राहुल द्रविड सारखा निष्णात प्रशिक्षक लाभला आहे ही खरच भाग्याची गोष्ट आहे. राहुल द्रविड महान खेळाडू आहे आणि तो अत्यंत बारकाईने तरुण खेळाडूंकडून नियोजित मेहनत करून घेतो. याचा चांगला परिणाम असा होत आहे की 'अ' संघातून जो खेळाडू चांगला खेळून मुख्य संघातून खेळायचा दावा करतो तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायला पूर्ण तयार असतो'', प्रसाद यांनी सांगितले. 

महेंद्रसिंग धोनी बद्दल बोलताना प्रसाद यांनी आंद्रे अगासीचे उदाहरण दिले, ""अगासीने वयाची तिशी पार केल्यावरच कमाल कामगिरी करून दाखवली. धोनीचे तसेच आहे. अजून तो एकदम तंदुरुस्त आहे आणि सर्वोच्च पातळीवर खेळायची त्याची जिद्द अचाट आहे. म्हणून तो संघात आहे. जर त्याच्या कामगिरीत कमतरता जाणवली तर आम्ही वेगळा विचार करू''.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news marathi website sports news India versus Sri Lanka