esakal | मेंडिस-करुणारत्नेने दाखविली जिगर; दुसऱ्या डावात श्रीलंकेची झुंज! 
sakal

बोलून बातमी शोधा

Kusal Mendis

मेंडिस-करुणारत्नेने दाखविली जिगर; दुसऱ्या डावात श्रीलंकेची झुंज! 

sakal_logo
By
सुनंदन लेले

कोलंबो : डोळ्यांसमोर पत्त्यांच्या बंगला कोलमडून पडावा, तसा श्रीलंकेचा पहिला डाव अवघ्या 49.4 षटकांत 183 धावांत गडगडला. 439 धावांची प्रचंड आघाडी आणि उपाहाराला मिळालेल्या विश्रांतीमुळे विराट कोहलीने श्रीलंकेला फॉलोऑन दिला. कोलंबोतील कसोटी सामनाही भारतीय संघ तीन दिवसांतच खिशात घालणार, असे वाटू लागले असतानाच दुसऱ्या डावात श्रीलंकेच्या फलंदाजांनी झुंज दिली. कुशल मेंडिसने आक्रमक शतक झळकाविताना करुणारत्नेबरोबर 191 धावांची मोलाची भागीदारी केली. 

या खेळीमुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला, तेव्हा श्रीलंकेने दुसऱ्या डावात दोन गडी गमावून 209 धावा केल्या. भारतीय संघाकडे अजूनही 230 धावांची आघाडी आहे. त्यामुळे सामना वाचविण्यासाठी श्रीलंकेला भीमकाय प्रयत्न करावे लागणार आहेत. 

तिसऱ्या दिवसाचा खेळ चालू झाल्यानंतर दिनेश चंडिमल रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर स्विपचा फटका मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला. त्यानंतर लगेचच उमेश यादवने मेंडिसचा अडथळा दूर केला. अनुभवी अँजेलो मॅथ्यूजने दोन षटकार, दोन चौकार मारून आक्रमक धोरण स्वीकारले. मॅथ्यूजचा अडथळा आश्‍विननेच दूर केला. अर्थात, या विकेटचे श्रेय आश्‍विनपेक्षा अफलातून झेल पकडणाऱ्या चेतेश्‍वर पुजाराला द्यावे लागेल. आश्‍विनचा वळणारा चेंडू मॅथ्यूजने डाव्या बाजूला मारला. लेग स्लिपमध्ये उभ्या असलेल्या पुजाराने डावीकडे झेपावत एका हातात जमिनीपासून एका इंचावर झेल पकडला. 

मॅथ्यूज बाद झाल्यानंतर इतर फलंदाज ठराविक अंतराने बाद होत राहिले. महंमद शमी आणि जडेजाने दोन फलंदाजांना बाद केले. त्यानंतर आश्‍विनने तळातील फलंदाजांना झटपट बाद करत श्रीलंकेचा डाव गुंडालला. डिकवेलाने अर्धशतक झळकाविले खरे; पण शमीच्या गोलंदाजीवर अत्यंत खराब फटका मारण्याच्या प्रयत्नात त्याने विकेट बहाल केली. यामुळे श्रीलंकेच्या फलंदाजांकडे संयमाचा अभावच असल्याचे स्पष्ट झाले. 

भारताकडून आर. आश्‍विनने 69 धावांच पाच गडी बाद केले. उपाहारालाच श्रीलंकेचा पहिला डाव संपल्याने कोहलीने फॉलोऑन देण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या डावातही श्रीलंकेची सुरवात खराब झाकी. अनुभवी उपुल थरंगाच्या यष्टी उमेश यादवने उध्वस्त केल्या. त्यानंतर पुन्हा एकदा श्रीलंकेचा डाव कोलमडणार असे वाटत असताना करुणारत्ने आणि मेंडिसने भारतीय गोलंदाजांना धैर्याने तोंड दिले. या दोघांनी भारतीय गोलंदाजांना यश मिळू दिले नाही. 

खेळपट्टी फिरकीला साथ देत असल्याने आश्‍विन व जडेजासमोर मेंडीस-करुणारत्ने बऱ्याचवेळा चकले; पण त्यांनी मोठे फटके मारण्याचे धाडस केले. सातत्याने चौकार मारले गेल्याने कोहलीला बचावात्मक पवित्रा घेणे भाग पडले. फिरकीसमोर दोन्ही फलंदाजांनी आडव्या बॅटने मुक्तपणे फटके मारले. मेंडिसने 120 चेंडूंतच शतक झळकाविले. लहान चणीच्या मेंडिसच्या फटक्‍यांमधील ताकद जबरदस्त होती. त्याच्या शतकानंतर भारतीय खेळाडूंनीही त्याच्या धाडसी खेळीचे कौतुक केले. 

ही जोडी फोडण्यासाठी कोहलीने चारही प्रमुख गोलंदाजांना आलटून-पालटून गोलंदाजी देऊन पाहिली. पण फलंदाजांवर याचा परिणाम झाला नाही. अखेर बदली गोलंदाज हार्दिक पांड्याने हळुवार चेंडूवर मेंडिसला चकविले. 110 धावांची सुंदर खेळी करून मेंडिस तंबूत परतला. तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला, तेव्हा सलामीवीर करुणारत्ने 92 धावांवर खेळत होता.