आशिष नेहराने जाहीर केली निवृत्ती; 1 नोव्हेंबरला खेळणार शेवटचा सामना 

वृत्तसंस्था
गुरुवार, 12 ऑक्टोबर 2017

हैदराबाद : भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज आशिष नेहराने आज (गुरुवार) सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय जाहीर केला. येत्या 1 नोव्हेंबर रोजी दिल्लीत न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या ट्‌वेंटी-20 सामना हा नेहराचा शेवटचा सामना असेल. 

हैदराबादमध्ये आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत नेहरा म्हणाला, "घरच्या मैदानावर निवृत्त होण्यासारखी दुसरी मोठी संधी मिळू शकत नाही! निवृत्तीसंदर्भात मी संघ व्यवस्थापन आणि निवड समितीशी चर्चा केली होती.'' निवृत्तीनंतर 'आयपीएल'मध्येही खेळणार नसल्याचे नेहराने स्पष्ट केले आहे. 

ऑस्ट्रेलियाविरुद्ध सध्या सुरू असलेल्या ट्‌वेंटी-20 मालिकेसाठी नेहराला संघात स्थान दिल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. आगामी विश्‍वकरंडक स्पर्धेच्या दृष्टीने तयारी करणाऱ्या भारतीय संघात 38 वर्षीय नेहराला स्थान कसे काय, असा प्रश्‍न अनेक तज्ज्ञांनी उपस्थित केला होता. 1999 मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण केलेल्या नेहराला सर्वाधिक यश मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्येच मिळाले. पदार्पणानंतर चार वर्षांनी दक्षिण आफ्रिकेत झालेल्या विश्‍वकरंडक स्पर्धेतील भारताच्या अंतिम फेरीपर्यंतच्या वाटचालीमध्ये नेहराचा वाटा मोठा होता. याच स्पर्धेत इंग्लंडविरुद्ध त्याने 23 धावांत सहा गडी बाद केले होते. 

जवागल श्रीनाथ आणि वेंकटेश प्रसाद यांच्या निवृत्तीनंतर झहीर खान आणि नेहरा यांनी भारतीय वेगवान गोलंदाजीची धुरा समर्थपणे सांभाळली होती. मात्र तंदुरुस्तीच्या समस्येशी सतत झगडावे लागल्याने नेहरा जवळपास चार वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर राहिला होता. त्यानंतर ट्‌वेंटी-20 क्रिकेटमध्ये त्याने चमकदार कामगिरी करून पुन्हा एकदा निवड समितीचे लक्ष वेधून घेतले होते. 2011 च्या विजयी विश्‍वकरंडक मोहिमेमध्ये नेहरा चमकला होता. बोटाला झालेल्या फ्रॅक्‍चरमुळे तो अंतिम सामना खेळू शकला नव्हता. त्यानंतर नेहरा एकदिवसीय क्रिकेट खेळलेला नाही. 

'आयपीएल'मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जकडून दोन मोसमांत चांगली कामगिरी केल्यामुळे त्याला 2016 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्‌वेंटी-20 मालिकेत स्थान देण्यात आले. त्यानंतर मायदेशात झालेल्या ट्‌वेंटी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेतही त्याचा समावेश होता. या वर्षी इंग्लंडविरुद्धच्या ट्‌वेंटी-20 मालिकेनंतर नेहरा आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळलेला नाही. 

नेहराची कारकिर्द 
कसोटी : 17 सामन्यांत 44 विकेट्‌स 
वन-डे : 120 सामन्यांत 157 विकेट्‌स 
ट्‌वेंटी-20 : 26 सामन्यांत 34 विकेट्‌स 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news marathi websites sports news cricket news Ashish Nehra