भारतीय क्रिकेटचा हसरा चेहरा 

ज्ञानेश भुरे
Saturday, 4 November 2017

कपिलदेवने भारतात वेगवान गोलंदाजांची परंपरा रुढ केल्यानंतर अनेक वेगवान गोलंदाज उदयास आले. अर्थात, आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांना कधीच वेगवान बिरुद मिळाले नाही. प्रत्येक गोलंदाज हा मध्यमगती गोलंदाज म्हणूनच ओळखला गेला.

असेच अनेक गोलंदाज आले आणि गेले. प्रत्येकाची कारकिर्द वाढलेल्या क्रिकेटमुळे (सततच्या खेळाने) प्रदिर्घ अशी राहिली नाही. अशाच पठडीतला आशिष नेहरा हा डावखुरा मध्यमगती गोलंदाज होता. सध्या सुरू असलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यानंतर त्याने निवृत्ती जाहिर केली.

कपिलदेवने भारतात वेगवान गोलंदाजांची परंपरा रुढ केल्यानंतर अनेक वेगवान गोलंदाज उदयास आले. अर्थात, आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांना कधीच वेगवान बिरुद मिळाले नाही. प्रत्येक गोलंदाज हा मध्यमगती गोलंदाज म्हणूनच ओळखला गेला.

असेच अनेक गोलंदाज आले आणि गेले. प्रत्येकाची कारकिर्द वाढलेल्या क्रिकेटमुळे (सततच्या खेळाने) प्रदिर्घ अशी राहिली नाही. अशाच पठडीतला आशिष नेहरा हा डावखुरा मध्यमगती गोलंदाज होता. सध्या सुरू असलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यानंतर त्याने निवृत्ती जाहिर केली.

नेहराची कारकिर्द कधीच वादळी म्हणा किंवा वादग्रस्त राहिली नाही. तंदुरुस्तीच्या आघाडीवर तो कायमच लक्षात राहिला. रणजी ते आंतरराष्ट्रीय आणि अलिकडचे 'आयपीएल' अशा वीस वर्षाच्या कारकिर्दीत नेहरा एकदा नव्हे, तर तब्बल बारा वेळा पायावरील शस्त्रक्रियेला सामोरा गेला. तरी देखील त्याचा उत्साह कधीच मावळला नव्हता. सतत हसरा चेहरा असल्यामुळे त्याला भारतीय क्रिकेटचा हसरा चेहरा म्हटले तरी वावगे ठरू नये. 

डावखुरा गोलंदाज हेच त्याचे मुख्य वैशिष्ट्य होते. पण, त्याच्या गोलंदाजीत असलेली विविधता कधीच कुणी गांभीर्याने घेतली नाही. कदाचित त्याने देखील नाही. त्यामुळेच गुणवत्ता असूनही तो एक पाऊल मागेच राहिला. चेंडूचा वेग, अचूकता, दिशा आणि टप्पा, विकेटच्या दोन्ही बाजूला चेंडू स्विंग करण्याची क्षमता, जोडीला धोकादायक इनस्विंग असे एका मध्यमगती गोलंदाजाकडे असायला हवेत असे सर्व गुण त्याच्याकडे होते. त्याच्याकडे कमी होती ती शारीरिक तंदुरुस्ती आणि त्यामुळेच त्याची कारकिर्द वीस वर्षे असली, तरी अल्पावधीच होती. कारण या कालावधीतही तो फार आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला नाही. त्याने 17 कसोटी, 120 एकदिवसीय आणि 26 टी 20 सामन्यात भारताचे प्रतिनिधीत्व केले.

वेगवान गोलंदाज म्हटले की बळकट शरीरयष्टी असणे स्वाभाविक असते. नेमकी तीच त्याच्याकडे नव्हती. सडपातळ म्हणण्यापेक्षा किरकोळ शरीरयष्टीमुळे तो कारकिर्दीत कामगिरी उंचावण्याच्या नेमक्‍या वेळी तंदुरुस्ती दाखवू शकला नाही. त्यामुळेच 2004 मध्ये त्याने अखेरचा कसोटी सामना खेळला. त्याचवेळी उदयास आलेल्या टी 20 क्रिकेटमधील चार षटकांच्या स्पेलमुळे नेहराच्या कारकिर्दीला संजीवनीच मिळाली असे म्हणावे लागले. कारण, 2004 नंतर त्याच्या कारकिर्दीत फक्त टी 20 क्रिकेटच उरले. वयाच्या 36व्या वर्षी पुन्हा एकदा त्याने उभारी घेत ताशी 140 कि.मी. वेगान गोलंदाजी करण्याची क्षमता दाखवून दिली. त्याचा फायदा झाला आणि 2016 टी 20 विश्‍वकरंडक स्पर्धेत तो भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. 

नेहराने 2000-01 मध्ये भारतीय संघातून पदार्पण केले. झिंबाब्वेविरुद्ध तो पहिला सामना खेळला. नव्या चेंडूवर प्रतिस्पर्धी फलंदाजांना लोळवायची त्याच्याकडे तेव्हा क्षमता होती. त्याचा दरारा होता. बुलावायो येथे त्याच्याच कामगिरीमुळे भारताने 15 वर्षांनंतर प्रथमच उपखंडाबाहेर कसोटी जिंकली होती. नक्कीच, त्या वेळी त्याच्या विषयी क्रिकेट पंडितांनी आडाखे बांधायला सुरवात केली होती. उज्ज्वल भवितव्य असणारा गोलंदाज म्हणून त्याच्याकडे बघितले जाऊ लागले. पण, तो स्वतःला सिद्ध करू शकला नाही. सुरवातीला म्हटल्याप्रमाणे किरकोळ शरीरयष्टिमुळे त्याच्या कामगिरीवर मर्यादा आल्या. दुखापती या प्रत्येक खेळाडूच्या कारकिर्दीचा एक भाग असतात. त्या हातात हात घालूनच चालत असतात. काही खेळाडू त्यावर मात करून तो हात सोडवून घेतात. नेहराला हेच जमले नाही. त्याचा कामगिरीवर परिणाम झाला. कारकिर्दीचा आलेख चढता राहण्यापेक्षा तो बऱ्याचदा उतरताच राहिला. समांतर राहिला पण, तो समांतरपणाही त्याला कायम ठेवता आला नाही. संघातील स्थानही आत-बाहेरच राहिले.

या कठिण परिस्थितीत 2003 विश्‍वकरंडक स्पर्धेत इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात 'तो' भेदक नेहरा पुन्हा गवसला. भारताचे सर्व गोलंदाज अपयशी ठरत असताना, नेहराने 23 धावांत सहा गडी बाद करून भारताला इंग्लंडविरुद्ध एकाहाती विजय मिळवून दिला. त्याच्या कारकिर्दीमधील ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. या सामन्यानंतरही तो तंदुरुस्तीच्या कारणामुळे संघापासून दूर राहिला. त्यातच ऑस्ट्रेलियाच्या अपयशी दौऱ्यामुळे त्याच्यावर अपयशाचा शिक्का बसला. त्यातच टाचेची दुखापत बळावल्याने त्याच्या कारकिर्दीला उतरती कळा लागली. झिंबाब्वेच्याच 2005 मधील दौऱ्यातून त्याला दुखापतीमुळे दौऱ्यातून अर्धवट बाहेर पडावे लागले. टाचेची दुखापत अधिक बळावल्यामुळे त्याची कारकिर्द अधिकच संथ झाली. अनेक नवे गोलंदाज तयार होत असल्याने त्याला संघात पुनरागमन करणे पुढे अवघडच गेले. त्याचवेळी 'आयपीएल'ला सुरवात झाली आणि या चार षटकांच्या क्रिकेटने त्याला जीवदान दिले.

दुसऱ्या सत्रातील आयपीएलमधील यशाने त्याला 2009 मध्ये वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी संघात स्थान मिळाले. त्या मोसमात त्याने सर्वाधिक 31 गडी बाद केले. त्याच्या कारकिर्दीमधील ही सर्वोत्तम कामगिरी होती. हे सातत्य पुढील वर्षी टिकले. त्याने 2010च्या मोसमात 28 गडी बाद केले. त्याला 2011च्या विश्‍वकरंडक संघात पुन्हा स्थान मिळाले. उपांत्य फेरीत त्याच्या अजोड कामगिरीने भारताने पाकिस्तानवर मात करून अंतिम फेरी काढली. त्या सामन्यात त्याला मैदानात खेळताना दुखापत झाली. उपांत्य फेरीत चांगली कामगिरी केल्यानंतरही तो अंतिम सामन्यापासून वंचित राहिला. अर्थात, भारत त्या वेळी विश्‍वविजेता ठरला. नेहरा संपला अशीच चर्चा सुरू झाली. त्यावर शिक्कामोर्तब होणार तोच पुन्हा एकदा 'आयपीएल' त्याच्या मदतीला आले. चेन्नईकडून खेळताना त्याने 22 गडी बाद केले आणि टीकाकारांना गप्प केले. तरी निवड समितीने त्याला नाकारले. 'कदाचित माझा चेहरा त्यांना आवडत नसावा,' अशी टिप्पणी त्याने त्या वेळी केली होती. तरी या पठ्ठ्याने जिद्द सोडली नाही. तो खेळत राहिला.

चार वर्षांनी त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात पुन्हा स्थान मिळाले. त्याच्या कामगिरीने भारताने ऑस्ट्रेलियात प्रथमच एकदिवसीय सामन्यांची मालिका जिंकली. हीच कामगिरी नंतर नेहराने आशिया करंडक, 2016 टी 20 विश्‍वकरंडक स्पर्धेत कायम राखली. पुन्हा एकदा तंदुरुस्तीच्या कारणाने तो बाहेर राहिला. या वेळी मात्र तो कायमचा राहिला. निवृत्तीच्या उंबरठ्यावर त्याला संघात पुन्हा स्थान मिळाले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याची निवड झाली. पण, त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. कायम हसत राहणाऱ्या नेहराने या वेळी मात्र निवृत्तीचा विचार केला आणि न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत खेळण्याची संधी मिळाल्यावर निवृत्त होण्याची घोषणा केली. त्याची कारकिर्द जेवढी वादग्रस्त ठरली नाही, तेवढी त्याची निवृत्ती मात्र वादग्रस्त ठरली. 
निवड समितीने त्याला आपण न्यूझीलंडनंतर पुन्हा तुझा विचार करणार नाही, असे सांगितल्याने त्याने निवृत्ती घेतली असे वक्तव्य केले. नेहराने मात्र, निवड समितीने आपल्याला असे कधीच सांगितले नाही. मीच भारतीय संघ व्यवस्थापनाला संघ रांची येथे असताना निवृत्त होणार असल्याचे सांगितल्याचे तो म्हणाला. निवड समितीला सांगून मी निवृत्त झालेलो नाही असे तो म्हणाला. 'मी क्रिकेट खेळायला निवड समितीला विचारुन सुरू केले नाही, मग निवृत्त होताना का त्यांना विचारू' असे तो उद्विग्नपणे म्हणाला आणि निवृत्त होताना भारताचा हसरा चेहरा रडवेला झाल्याचे पाहून नक्कीच वाईट वाटते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news marathi websites sports news cricket news Ashish Nehra Team India Dnyanesh Bhure