क्रिकेट: दोन धावांत सर्वबाद; एकाच डावात नऊ फलंदाजांचा 'भोपळा'! 

वृत्तसंस्था
Friday, 24 November 2017

नवी दिल्ली : क्रिकेटच्या इतिहासामध्ये अनेक चित्रविचित्र स्कोअरकार्ड पाहण्यात आले आहेत; पण 'बीसीसीआय'च्या देशांतर्गत महिलांच्या 19 वर्षांखालील स्पर्धेतील एका सामन्यात कमालच झाली.. या स्पर्धेत नागालँडचा संघ केवळ दोन धावांत गुंडाळला गेला. त्यातही, एक अतिरिक्त धाव होती. 

गुंटूरमधील जे. के. सी. महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या या सामन्यामध्ये केरळच्या गोलंदाजांसमोर नागालँडच्या फलंदाजांनी अक्षरश: शरणागती पत्करली. नागालँडची सलामीवीर मेनका हिनेच संघाकडून एकमेव अधिकृत धाव घेतली. केरळची सलामीची गोलंदाज अलीना सुरेंद्रनने एक चेंडू वाईड टाकल्याने नागालँडच्या खात्यात आणखी एक धाव जमा झाली. विशेष म्हणजे, या सामन्यात धावा देणारी आणि एकही विकेट घेऊ शकणारी सुरेंद्रन ही केरळची एकमेव गोलंदाज होती. तिच्या गोलंदाजीचे पृथ:करण 3-2-2-0 असे होते. केरळची कर्णधार मिनू मणीने चार निर्धाव षटके टाकत चार फलंदाज बाद केले. 

विजयासाठी असलेले तीन धावांचे लक्ष्य केरळने पहिल्याच चेंडूवर पार केले. नागालँडची सलामीची गोलंदाज दीपिका कैन्तूराने पहिला चेंडू वाईड टाकला. त्यानंतरच्या चेंडूवर सलामीवीर अन्सू राजूने चौकार मारत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. 

याच मोसमामध्ये नागालँडच्या संघाने एकाच सामन्यात 42 वाईड चेंडू टाकले होते; पण त्या सामन्यातील प्रतिस्पर्धी मणिपूरने तर तब्बल 94 वाईड चेंडू टाकले होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news marathi websites sports news cricket News BCCI