esakal | डेव्हिड मिलरचे 35 चेंडूंत विक्रमी शतक 
sakal

बोलून बातमी शोधा

File photo

डेव्हिड मिलरचे 35 चेंडूंत विक्रमी शतक 

sakal_logo
By
वृत्तसंस्था

पोशेस्ट्रूम : दक्षिण आफ्रिकेच्या डेव्हिड मिलरने काल (रविवार) ट्‌वेंटी-20 क्रिकेटमधील सर्वाधिक वेगवान शतक झळकाविले. मिलरच्या झंझावातामुळे दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशवर 83 धावांनी सहज विजय मिळवित मालिकाही जिंकली. 

मिलरने केवळ 35 चेंडूंतच शतक झळकाविले. यापूर्वीचा ट्‌वेंटी-20मधील वेगवान शतकाचा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्याच रिचर्ड लेव्हीच्या नावे होता. त्याने 2012 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध हा पराक्रम केला होता. लेव्हीने 45 चेंडूंत शतक झळकाविले होते. विशेष म्हणजे, ट्‌वेंटी-20 मध्ये वेगवान शतकांच्या यादीत पहिल्या तीन क्रमांकांवर दक्षिण आफ्रिकेचेच फलंदाज आहेत. तिसऱ्या क्रमांकावर फाफ डू प्लेसिस आहे. त्याने 2015 मध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध 46 चेंडूंत शतक पूर्ण केले होते. 

या विक्रमी खेळीदरम्यान मिलरने सात चौकार आणि नऊ षटकार खेचले. विशेष म्हणजे, या सामन्यात तो पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरला होता. ट्‌वेंटी-20 मध्ये चौथ्यापेक्षा खालच्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्याने शतक झळकाविण्याची ही पहिलीच वेळ ठरली. 

मिलरच्या धडाक्‍यापूर्वी सलामीवीर हाशिम आमलानेही 51 चेंडूंत 85 धावा करत बांगलादेशच्या गोलंदाजांची पिटाई केली होती. डावाच्या दहाव्या षटकात फलंदाजीसाठी आलेल्या मिलरने चौफेर फटकेबाजी केली. महंमद सैफुद्दीनने टाकलेल्या डावाच्या 19 व्या षटकामध्ये त्याने पहिल्या पाच चेंडूंवर पाच षटकार खेचले. या षटकात त्याने एकूण 31 धावा फटकाविल्या. ट्‌वेंटी-20 मध्ये एकाच षटकात पाच किंवा पाचपेक्षा अधिक षटकार खेचण्याचा पराक्रम यापूर्वी युवराजसिंग आणि एव्हिन लुईस यांनी केला होता. 

या फटकेबाजीमुळे दक्षिण आफ्रिकेने 20 षटकांत चार बाद 224 धावा केल्या. या आव्हानासमोर बांगलादेशचा डाव 141 धावांत संपुष्टात आला. सलामीवीर सौम्या सरकारने सर्वाधिक 44 धावा केल्या. 

संक्षिप्त धावफलक : 
दक्षिण आफ्रिका : 20 षटकांत 4 बाद 224 
(हाशिम आमला 85-51 चेंडू, 11 चौकार, 1 षटकार, एबी डिव्हिलर्स 20-15 चेंडू, 1 चौकार, 1 षटकार, डेव्हिड मिलर नाबाद 101-36 चेंडू, 7 चौकार, 9 षटकार) 
विजयी विरुद्ध 
बांगलादेश : 18.3 षटकांत सर्वबाद 141 

(सौम्या सरकार 44-27 चेंडू, 6 चौकार, 1 षटकार, महमदुल्ला 24-20 चेंडू, 2 चौकार, 23 महंमद सैफुद्दीन 23-26 चेंडू, 1 चौकार, 1 षटकार) 

loading image