esakal | स्विंगच्या जोडीला आता वेगही आला.. : भुवनेश्‍वर कुमार 
sakal

बोलून बातमी शोधा

Bhuvneshwar Kumar

मी संघातील प्रमुख गोलंदाज आहे, असे अजिबात म्हणणार नाही. आम्ही सगळेच कसून मेहनत करत आहोत. ज्याला संधी मिळेल, तो उत्तम कामगिरी करत आहे. सध्याचा व्यग्र कार्यक्रम पाहता सर्वच खेळाडूंवरील भार कमी करण्याचा संघ व्यवस्थापनाचा प्रयत्न आहे. 
- भुवनेश्‍वर कुमार

स्विंगच्या जोडीला आता वेगही आला.. : भुवनेश्‍वर कुमार 

sakal_logo
By
पीटीआय

कोलकाता : 'आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळायला सुरवात केली, तेव्हा मी स्विंगवरच भर देत होतो. आता अनुभव आणि वेग दोन्ही असल्याने माझी गोलंदाजी अधिकच भेदक झाली आहे' अशी प्रतिक्रिया भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्‍वर कुमार याने व्यक्त केली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भुवनेश्‍वरने तीन गडी बाद केले होते. 

ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलग दुसऱ्या सामन्यात भारताने विजय मिळवित पाच सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियासमोर मोठे आव्हान उभे केले नव्हते. मात्र, भुवनेश्‍वरने डावाच्या सुरवातीलाच दोन्ही सलामीवीरांना बाद करत ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का दिला. त्याच्या पहिल्या स्पेलमध्ये भुवनेश्‍वरने सहा षटकांत केवळ नऊ धावा देत दोन गडी बाद केले होते. त्यानंतर डावाच्या शेवटच्या टप्प्यात कर्णधार विराट कोहलीने पुन्हा एकदा भुवनेश्‍वरच्या हाती चेंडू दिला आणि त्याने लगेचच अखेरच्या फलंदाजाला बाद करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. 

या विजयानंतर भुवनेश्‍वर म्हणाला, "मी आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळायला सुरवात केली, तेव्हा माझी कामगिरी उंचावण्यासाठी मला स्विंगसाठी पोषक वातावरण असण्याची गरज भासायची. पदार्पण केल्यानंतर एका वर्षानंतर मला माझा वेग वाढविण्याची गरज वाटू लागली. पण ते करायचे कसे, याबद्दल काहीच माहीत नव्हते. त्यानंतर प्रशिक्षक शंकर बासू यांनी माझ्या प्रशिक्षणामध्ये बदल केला. त्यानंतर माझा वेगही वाढला आणि डावाच्या शेवटच्या षटकांमध्ये अचूक गोलंदाजी करण्याची कलाही साध्य झाली.'' 

गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघाची गोलंदाजीची बाजू बळकट झाली आहे. उमेश यादव आणि महंमद शमी यांच्यासारखे प्रतिभावान वेगवान गोलंदाज सध्या राखीव खेळाडूंमध्ये बसले आहेत आणि प्रत्यक्ष मैदानावर गोलंदाजीची धुरा भुवनेश्‍वर आणि जसप्रित बुमराह सांभाळत आहेत. याशिवाय, हार्दिक पांड्याही पूरक अष्टपैलू खेळाडू म्हणून तयार होत आहे.