esakal | ऑस्ट्रेलियाने रोखला भारताचा विजयरथ; बंगळूरमध्ये 21 धावांनी पराभव 
sakal

बोलून बातमी शोधा

ऑस्ट्रेलियाने रोखला भारताचा विजयरथ; बंगळूरमध्ये 21 धावांनी पराभव 

ऑस्ट्रेलियाने रोखला भारताचा विजयरथ; बंगळूरमध्ये 21 धावांनी पराभव 

sakal_logo
By
वृत्तसंस्था

बंगळूर : संथ झालेल्या खेळपट्टीवर गोलंदाजीत कल्पक बदल करत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी बलाढ्य भारताचा विजयरथ आज (गुरुवार) रोखला. यंदाच्या मालिकेत प्रथमच बहरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीनंतर गोलंदाजांनीही कमाल केली. ऑस्ट्रेलियाच्या 335 धावांच्या आव्हानासमोर भारताने 313 धावांपर्यंतच मजल मारली. भारताचा 21 धावांनी पराभव करत ऑस्ट्रेलियानेही त्यांच्या पराभवाची मालिका खंडीत केली. 

या पराभवामुळे एकदिवसीय सामन्यांमध्ये सलग दहा विजय मिळविण्याच्या भारताच्या स्वप्नावर पाणी पडले. भारताने हा विजय मिळविला असता, तर तो नवा विक्रम ठरला असता. तसेच, पाच सामन्यांची मालिका यापूर्वीच गमावलेल्या ऑस्ट्रेलियाला प्रतिष्ठा राखता आली. 

अजिंक्‍य रहाणे आणि रोहित शर्मा यांनी गेल्या सामन्याप्रमाणेच आजही धडाक्‍यात सुरवात केली. या दोघांनी पुन्हा एकदा शतकी सलामी दिली. डावाच्या 19 व्या षटकात रहाणेला बाद करून केन रिचर्डसनने ही जोडी फोडली. त्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी धावगती कायम राखली. पण कोहली-रोहितमधील समन्वयाच्या अभावाचा फटका भारताला पुन्हा बसला. धाव घेताना समन्वय नसल्याने रोहित शर्मा धावबाद झाला. त्यानंतर कोहलीनेही धावसंख्येत फार भर घातली नाही. 

चौथ्या क्रमांकावर बढती मिळालेल्या हार्दिक पांड्याला उंचावलेली धावगती आवाक्‍यात आणता आली नाही. 40 चेंडूंत 41 धावा करून पांड्या बाद झाला. त्यानंतर केदार जाधव आणि मनीष पांडे यांनी विजयासाठी जीव तोडून प्रयत्न केले. पण पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ काही वेळ थांबविण्यात आला आणि त्यानंतर या दोघांना आधीची लय पुन्हा गवसली नाही. तीन धावांच्या अंतरात भारताने केदार आणि पांडे दोघांनाही गमावले. 

'एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम फिनिशर्सपैकी एक' असा लौकिक असलेल्या महेंद्रसिंह धोनीला आज 'टायमिंग' साधता आले नाही. त्यामुळे एक षटकार खेचून नंतर लगेचच तो बाद झाला. 

शतकवीर वॉर्नरची फिंचसह द्विशतकी सलामी 
शतकवीर डेव्हिड वॉर्नर आणि शतकाच्या जवळ जाणाऱ्या ऍरोन फिंच यांच्या द्विशतकी सलामीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत प्रथमच आत्मविश्‍वासाने फलंदाजी करताना 334 धावांपर्यंत मजल मारली. भारताने गोलंदाजीत केलेले बदल ऑस्ट्रेलियाच्या पथ्यावर पडले. 

पहिल्या तीन सामन्यांत ऑस्ट्रेलियाची नाकेबंदी करणाऱ्या भुवनेश्‍वर कुमार, जसप्रीत बुमरा आणि कुलदीप यादव यांना आज विश्रांती दिली. या संधीचा फायदा घेत वॉर्नर आणि फिंच यांनी आपापल्या बॅट परजल्या. 231 धावांच्या सलामीत या दोघांनी मिळून 22 चौकार आणि सात षटकार मारले. 

वॉर्नर-फिंच यांची फलंदाजी बहरलेली असताना ऑस्ट्रेलियाने साडेतीनशेच्या पलीकडे मजल मारण्याची चिन्हे दिसत होती; पण या दोघांनंतर हॅंडस्कॉम्बचा अपवाद वगळता इतर फलंदाजांवर भारतीय गोलंदाजांनी अंकुश ठेवला. फलंदाजीस पोषक असलेल्या खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी करण्याची संधी ऑस्ट्रेलियाला मिळाली. त्याच वेळी त्यांना रोखण्यासाठी भारताकडून उमेश यादव आणि महंमद शमी ही जोडी उतरली.

गेल्या विश्‍वकरंडक स्पर्धेत या दोघांनी भलतीच प्रभावी कामगिरी केली होती; पण आता बऱ्याच कालावधीनंतर ते एकदिवसीय सामना खेळत असल्यामुळे लय मिळवण्यास त्यांना उशीर होत होता. त्यांच्या प्रत्येकी एक षटकात किमान एक तरी चौकार मारला जात होता. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची धावगती सहाच्या सरासरीपेक्षा पुढेच जात होती. 

अखेर 35 व्या षटकांत बदली गोलंदाज केदार जाधवने वॉर्नरला बाद करून भारताला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर पुढच्याच षटकांत उमेशने फिंचला सलग दुसऱ्या शतकापासून सहा धावा दूर ठेवले. आपल्या पुढच्या षटकात उमेशने कर्णधार स्मिथचा बळी मिळवला. त्यामुळे बिनबाद 231 वरून ऑस्ट्रेलियाची 3 बाद 236 अशी स्थिती झाली. त्यानंतर ट्रॅव्हिस हेड आणि हॅंडसकॉम्ब यांनी आपला संघ तीनशेच्या पलीकडे मजल मारेल याची काळजी घेतली. 

संक्षिप्त धावफलक :

ऑस्ट्रेलिया : 5 बाद 334 (ऍरॉन फिंच 94- 96 चेंडू, 10 चौकार, 3 षटकार, डेव्हिड वॉर्नर 124- 119 चेंडू, 12 चौकार, 4 षटकार, हॅंडसकॉम्ब 43- 30 चेंडू, 3 चौकार, 1 षटकार, स्टोनिस नाबाद 15- 9 चेंडू, 1 चौकार, 1 षटकार, उमेश यादव 10-0-71-4, केदार जाधव 7-0-38-1)
भारत : 50 षटकांत 8 बाद 313 
अजिंक्‍य रहाणे 53, रोहित शर्मा 65, विराट कोहली 21, हार्दिक पांड्या 41, केदार जाधव 67, मनीष पांडे 33, महेंद्रसिंह धोनी 13, अक्षर पटेल 5, महंमद शमी नाबाद 6, उमेश यादव नाबाद 2

loading image