esakal | ट्‌वेंटी-20 साठी नेहरा, धवन, कार्तिकचे पुनरागमन 
sakal

बोलून बातमी शोधा

File photo

ट्‌वेंटी-20 साठी नेहरा, धवन, कार्तिकचे पुनरागमन 

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मुंबई : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी ट्‌वेंटी-20 क्रिकेट मालिकेसाठी अनुभवी वेगवान गोलंदाज आशिष नेहरा याचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. यष्टिरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिकलाही दीर्घ कालावधीनंतर भारतीय संघात स्थान मिळाले आहे. याशिवाय, घरगुती कारणांमुळे एकदिवसीय मालिकेतून माघार घेतलेल्या शिखर धवनलाही संधी मिळाली आहे. 

ऑस्ट्रेलियाविरुद्धची पाच सामन्यांची मालिका भारताने 4-1 अशा वर्चस्वासह जिंकली. आता येत्या 7 ऑक्‍टोबरपासून तीन ट्‌वेंटी-20 सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकेसाठीच्या भारतीय संघाची घोषणा काल (रविवार) रात्री करण्यात आली. 

अनुभवी गोलंदाज आशिष नेहराने यापूर्वी फेब्रुवारीमध्ये इंग्लंडमध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्यानंतर वेस्ट इंडीज आणि श्रीलंकेविरुद्धच्या ट्‌वेंटी-20 मालिकेस तो मुकला होता. विंडीजविरुद्ध कार्तिकला संघात स्थान होते. श्रीलंका दौऱ्यातील ट्‌वेंटी-20 संघातील शार्दुल ठाकूर आणि अजिंक्‍य रहाणे यांना या मालिकेसाठी वगळण्यात आले आहे. गेल्या वर्षी ऑगस्टनंतर रहाणेला भारताच्या ट्‌वेंटी-20 संघात स्थान मिळालेले नाही. 

याशिवाय अनुभवी गोलंदाज आर. आश्‍विन आणि रवींद्र जडेजा यांनाही पुन्हा विश्रांती देण्यात आली आहे. 

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्‌वेंटी-20 मालिकेसाठी भारतीय संघ 
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, के. एल. राहुल, मनीष पांडे, केदार जाधव, दिनेश कार्तिक, महेंद्रसिंह धोनी (यष्टिरक्षक), हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, जसप्रित बुमराह, भुवनेश्‍वर कुमार, आशिष नेहरा, अक्षर पटेल. 

loading image