esakal | ऑस्ट्रेलियाविरुद्धचा निर्णायक टी-20 सामना आज 
sakal

बोलून बातमी शोधा

ऑस्ट्रेलियाविरुद्धचा निर्णायक टी-20 सामना आज 

ऑस्ट्रेलियाविरुद्धचा निर्णायक टी-20 सामना आज 

sakal_logo
By
वृत्तसंस्था

हैदराबाद : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या झटपट क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत गाजवलेल्या वर्चस्वाची विजयी सांगता आणि त्याचबरोबर टी-20 मालिका विजय असा संगम उद्या (ता. 13) भारतीय संघाला गाठायचा आहे; परंतु त्यासाठी फलंदाजीची घडी बसवायला लागणार आहे. 

एकदिवसीय मालिकेत 4-1 असा विजय मिळवल्यानंतर तीन सामन्यांची टी-20 मालिका जिंकण्याची संधी गुवाहाटीत मिळाली होती; परंतु फलंदाजांच्या अपयशामुळे पराभवाचा सामना करावा लागला. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जेसन बेहड्रॉफने भारतीय फलंदाजीचे कंबरडे मोडले होते. त्यानंतर डाव सावरूच शकला नव्हता. 
भारतीय संघाने गेल्या काही महिन्यांत मिळवलेल्या यशामध्ये फलंदाजांची कामगिरी उजवी राहिलेली आहे. गुवाहाटीत प्रथमच आव्हान मिळाले होते. या सामन्यात झालेल्या चुकांपासून बोध घेणारे भारतीय फलंदाज उद्या मात्र अपयशाची भरपाई करताना दिसतील, अशी आशा आहे. 

रोहित शर्मा, शिखर धवन आणि विराट कोहली या पहिल्या तीन फलंदाजांना लौकिकाप्रमाणे खेळ करावा लागेल. मनीष पांडेवर सर्वाधिक दडपण असेल. कदाचित उद्याच्या सामन्यात बदल होऊन त्याच्याऐवजी केएल राहुललाही संधी दिली जाऊ शकते. 

दुसऱ्या सामन्यात लढण्यासाठी भारतीय गोलंदाजांसाठी पुरेशा धावाच नसल्यामुळे गोलंदाजीची धार कमी झाली होती. आता मालिका जिंकण्याचा किंवा गमावण्याचा प्रश्‍न असल्यामुळे बुमरा-भुवनेश्‍वर कुमार तसेच कुलदीप-चाहल हे भेदकता वाढवण्याच्या तयारीत असतील. 

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर, ऍरॉन फिन्च, मोसिस हेन्रिकेस, डॅन ख्रिस्तियन आणि ग्लेन मॅक्‍सवेल यांच्याकडे आयपीएलच्या रूपाने भारतात ट्‌वेन्टी-20 खेळण्याचा अनुभव असल्यामुळे भारतीयांसाठी उद्याची लढाई सोपी नसेल. 

नेहराला संधी मिळणार? 
एक नोव्हेंबरला निवृत्त होत असल्याची घोषणा करणारा डावखुरा वेगवान गोलंदाज आशिष नेहरालाही संधी दिली जाऊ शकते. त्याने दिल्लीतील कोटला मैदानावरील सामन्यानंतर निवृत्ती जाहीर केली आहे.

loading image